दादरमध्ये पेव्हर ब्लॉकने ठेचून एकाची हत्या, एक जखमी

दादर पूर्व येथे बुधवारी पेव्हर ब्लॉकने ठेचून ३० वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. आरोपीने केलेल्या मारहाणीत हत्या झालेल्या व्यक्तीचा मित्रही जखमी झाला. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दादर रेल्वे स्थानकाजवळील पदपथकावर आरोपी राजू देवळेकर (५०)  झोपला होता. त्यावेळी आकाश ठाकूर (३०) व अनिलकुमार गुप्ता (३५) या दोघांनी झोपलेल्या देवळेकरला चहा-पाण्याबद्दल विचारले. त्यावेळी देवळेकर संतापला व त्याने ठाकूर आणि गुप्ताला शिवीगाळ केली.

त्यानंतर देवळेकरने शेजारी पडलेला पेव्हर ब्लॉक उचलला आणि ठाकूरवर हल्ला केला. त्याने १० ते १२ वेळा ठाकूरच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने प्रहार केला. ठाकूर खाली कोसळल्यानंतर त्याने गुप्तावरही पेव्हर ब्लॉकने हल्ला केला. सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही.

घटनेनंतर ठाकूरला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. गुप्ताच्या तक्रारीवरून याप्रकरणी भादंवि कलम ३०२ (हत्या) व ३२४ (मारहाण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी देवळेकरला माटुंगा पोलिसांनी अटक केली.

देवळेकर सेनापती बापट मार्ग येथील झोपडपट्टीत राहतो. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या