कंपनीला धडा शिकवण्यासाठी बेवसाईट केली हॅक

पगार रखडवणाऱ्या कंपनीच्या मालकाला धडा शिकवण्यासाठी कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने थेट कंपनीची बेवसाईटच हॅक केल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी दिपेश बुधभट्टी या साॅफ्टवेअर इंजिनिअरवर गुन्हा नोंदवून त्याला गुजरातमध्ये अटक केली आहे.

न्यायालयात धाव

माटुंगात मुख्य कार्यालय असलेल्या संबंधीत कंपनीची विविध राज्यात युनिट आहेत.  गुजरात युनिटमध्ये दिपेश बुधभट्टी कार्यरत होता. मागील काही महिन्यांपासून कंपनीला उतरती कळा लागल्यामुळे कंपनीने राज्यातील युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थकवले. आधीच वाढलेल्या महागाईत पगार थकल्याने अनेक तरुणांनी नोकऱ्या सोडल्या. त्यात दिपेशचाही समावेश होता. मात्र मेहनतीचे पैसे का सोडा? या उद्देशाने दिपेशने न्यायालयात धाव घेत कंपनीकडून पैसे वसूल केले. 

कंपनीला आर्थिक नुकसान

मात्र कंपनीने पगार थकविल्याचा राग दिपेशच्या मनात होता. याच रागातून त्याने स्वत:ला ज्याप्रमाणे आर्थिक नुकसान सहन करावे लागले तसे कंपनीलाही त्याची झळ बसावी या उद्देशाने दिपेशने कंपनीचा आर्थिक व्यवहार चालणारी वेबसाईट हॅक करण्याचं ठरवलं. त्यानुसार २३ मार्च ते १ ऑगस्ट २०१८ दरम्यान कंपनीच्या दोन्ही वेबसाईट हॅक केल्या. कंपनीचे कामकाज ठप्प झाल्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. या प्रकरणी कंपनीकडून माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासाअंती चौकशीदरम्यान दीपेश या कंपनीच्या आधीच्या कर्मचाऱ्यानेच ही वेबसाईट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार पोलिसांनी दीपेशला गुजरातहून अटक केली. या प्रकरणी माटुंगा पोलिस अधिक तपास करत आहेत. 


हेही वाचा -

दीड लाखांसाठी महेश भट्ट यांच्यावर गोळीबार, गँगस्टर रोडिओवालाची कबुली


पुढील बातमी
इतर बातम्या