घाटकोपरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या

घाटकोपरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. बबलू दुबे असं त्याचं नाव आहे. तीन व्यक्तींनी बबलूवर भर रस्त्यात चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या प्रकरणी घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी विजय धर्मा आखाडे (३७), संजय पटवा (२९) यांना अटक केली आहे. तर तिसरा आरोपी गोपाळ नाडर याचा पोलिस शोध घेत आहेत. 

सुडातून हत्या ?

घाटकोपर येथील जागृती नगर मेट्रो स्टेशन परिसरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिघांनीा ४० वर्षीय बबलूवर चाकूने हल्ला चढवला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बबलूला रुग्णालयात नेण्यास कुणीही पुढे सरसावलं नाही. पंतनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत, बबलूला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बबलूचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषीत केलं. दुबे याच्यावर मर्डरसह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सुडाच्या भावनेतूनच ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी विजय धर्मा आखाडे (३७), संजय पटवा (२९) यांना  अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी दिली आहे. हे तिघेही सराईत आरोपी असून आखाडेवर पंतनगर पोलिस ठाण्यात ६, घाटकोपर पोलिस ठाण्यात १ आणि टिळक नगर पोलिस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. तर पटवा विरोधात अँण्टाँप हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर फरार आरोपी नाडर याच्या विरोधात धारावी पोलिस ठाण्यात ४ गुन्हे, आरसीएफ पोलिस ठाण्यात २,चुनाभट्टी पोलिस ठाण्यात २, चेंबूर पोलिस ठाण्यात १ गुन्ह्याची नोंद आहे. नाडरवर हत्येचा ही गुन्हा नोंद असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.  


हेही वाचा -

मुंबईतून सौदी अरेबियाला २६ मुलींची तस्करी, वृद्धाला अटक

मोलकरणीवर बलात्कारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या