अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराची बनवली व्हिडिओ क्लिप

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे.

अत्याचाराची बनवली व्हिडिओ क्लिप 

विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. शालेय शिक्षण घेत असलेली मुलगी काही महिन्यांपूर्वी अभ्यासातील अडचणी घेऊन शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाकडे गेली होती. त्यावेळी घरात कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत. त्या तरुणाने मुलीवर अत्याचार केले. ऐवढ्यावरच न थांबता, त्याने छुप्या कॅमेऱ्याने त्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिपही बनवली. त्यानंतर आरोपी वारंवार मुलीला बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार करत होता. कालांतराने त्याने मुलीला धमकावत आपल्या मित्रांसोबतही संबध ठेवण्यास भाग पाडले. या आरोपींच्या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबियांना दिली.

आरोपींना अटक

त्यानुसार कुटुंबियांनी शुक्रवारी २ फेब्रुवारीला विलेपार्ले पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी आरोपी सिद्धेश धुरी, मयुर कोतवलकर, सौरभ राणे, अक्षय बोरकर, मयुर चव्हाण, अभिजीत जडियार या सहा जणांविरोधात बलात्कार, विनयभंंग, धमकावणे आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. यामध्ये राजकीय पक्षाचा एक कार्यकर्ताही सामील असल्याचं समजते. रविवारी न्यायालयाने अटक आरोपींना १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून इतर तीन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या