हेही वाचाः- वरळीत कोरोनासूर आणि हिंगणघाट आरोपीच्या प्रतिकृतीचं दहन
मरोळ येथील सशस्त्र पोलिस दलात कार्यरत असताना संतोषने एका विवाहितेला आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. या दरम्यान त्याने विवाहितेला कल्याण येथील लाॅजवर नेत तिच्यावर अत्याचार केले. या दरम्यान त्याने विवाहितेच्या न कळत तिचा अश्लील व्हिडिओ मोबाइलमध्ये काढला होता. कालांतराने हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी तो विवाहितेला देऊ लागला. या घटनेची माहिती विवाहितेने तिच्या आईला सांगितल्यानंतर संतोषने हा व्हिडिओ सोशल मिडियावर न टाकण्याकरता विवाहितेच्या आईजवळ खंडणी मागितली. बदनामीच्या भितीने दोघींना जुळवा जुळव करून संतोषने खंडणी स्वरुपात मागितलेली रक्कम त्याला दिली.
मात्र पैसे घेऊन सुद्धा संतोष वारंवार त्रास देत होता. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहिता संतोषची तक्रार घेऊन पोलिस आयुक्तांकडे गेली. आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चौकशीत संतोष दोषी आढळल्यानंतर संतोषवर वडाळा टीटी पोलिस ठाण्यात ५ जूनला विनयभंग, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६७(अ) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. अटकेच्या कारवाईनंतर संतोषला सेवेतून निलंबित करण्यात आले. या प्रकरणाची विभागीय चौकशी सहाय्यक पोलिस आयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना. त्यात संतोषने खाकी वर्दीचा गैरवापर करून खात्याला काळिमा फासणारे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संतोषवर घृणास्पद कृत्य खात्याची शिस्त व प्रतिमा बिघडविणारे कृत्य केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र नागरीसेवा अधिनियम आणि भारतीय संविधान अनुच्छेद ३११ (२) बी अन्वये सेवेततून बडतर्फ करण्यात आले आहे.