कस्टम ड्युटी चुकवून सोने तस्करी; २१ लाखांची ५८ बिस्किटं हस्तगत

कस्टम ड्युटी चुकवून मुंबईसह इतर शहरात सोन्याची तस्करी करणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी अावळल्या अाहेत. पोलिसांनी या टोळीकडून ६.७६ किलोची २१ लाख रुपयांची ५८ सोन्याची बिस्किटं हस्तगत केली आहेत. मेहबूब अली मोहम्मद हुसेन शेख (३९), सैजा परवीन फरिद शेख (३७), जाफर अकबर खान (४६), मोहम्मद अब्दुल अजी शेख (३०), तबसूम परविज खान (२७) अशी या अटक आरोपींची नावे आहेत.

अाखाती देशातून अाणलं सोनं

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात कस्टम ड्युटी चुकवून एक टोळी आखाती देशातून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांना मिळाली होती. ही टोळी आर्थिक व्यवहारासाठी बोरिवली परिसरात येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी एका कारमध्ये दोन महिला व तीन पुरूषांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तरं अाल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत ३ सोन्याच्या विटा सापडल्या. या पाच जणांच्या चौकशीतून पोलिसांनी त्यांच्या घरी लपवण्यात आलेल्या ५५ सोन्याच्या विटा हस्तगत केल्या. हे सर्व सोने या टोळीने आखाती देशातून कंबरेत लपवून आणले होते. 

पुणे, चेन्नई विमानतळावरून तस्करी

मुंबई विमानतळावर सुरक्षा यंत्रणा सोने तस्करांबाबत सतर्क असल्यामुळे या टोळीने पुणे आणि चेन्नई विमानतळावरून हे सोनं राज्यात आणलं होतं. यातील काही सोने या टोळीने झवेरी बाजार येथे विकल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा ११ चे पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.


हेही वाचा - 

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

गुंतवणुकीच्या नावाखाली ७०० जणांना कोट्यवधींचा गंडा, दाम्पत्याला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या