कुठल्याही दुर्घटनेत जखमी व्यक्तींच्या मदतीला धावून जाणं, त्यांना तातडीनं उपचार मिळवून देणे, हे मुंबईकरांचं खरं स्पिरिट. मात्र जखमींना मदत करणाऱ्यांना पोलिसांच्या दमदाटीला सामोरं जावं लागलं अाहे. पोलीस येईपर्यंत थांबता अालं नाही का? असा सवाल पोलिसांनी त्या जखमीला मदत करणाऱ्यांना विचारला. पण या मदतकर्त्यांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतल्याने अाता या दमदाटी प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वे स्थानकांत जखमी अवस्थेत होती व्यक्ती
श्रवण तिवारी हे शनिवारी रात्री घरी जाण्यासाठी चर्नीरोड स्थानकावर थांबले होते. रेल्वेची वाट पाहत असताना रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ काही जण खाली वाकून पाहत होते. एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांच्या लक्षात अाले. त्या व्यक्तीच्या खिशातील अोळखपत्रावरून त्या जखमी व्यक्तीचे नाव अश्विन सावंत असल्याचे समोर अाले. त्यावेळी रेल्वे प्रशासनाचा कोणताच अधिकारी तिथं उपस्थित नव्हता. त्यामुळे श्रवणने अन्य दोघांच्या मदतीने जखमी अश्विन सावंत यांना जवळच्या सैफी रुग्णालयात नेले.
जीअारपी पोलिसांनी केली दमदाटी
मात्र जीअारपी पोलिसांनी उलट मदतकर्त्यांनाच दमदाटी करण्यास सुरुवात केली. पोलीस येईपर्यंत वाट पाहता अाली नाही का? अशा शब्दांत त्यांनी मदतकर्त्यांना सुनावले. पोलीसांच्या या उद्दाम वागणुकीमुळे संतापलेल्या मदतकर्त्यांनी मात्र पोलिसांनाच धारेवर धरण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी पळ काढणेच पसंत केले. या संपूर्ण घटनेची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची नोंद चर्चगेट पोलिसांकडे करण्यात अाली अाहे. अश्विन सावंत हे नैसर्गिक विधीसाठी गेले असताना रेल्वेच्या धडकेत ते जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पण त्यांना मदत करणाऱ्यांना दटावणाऱ्या पोलिसांची मात्र चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.