८० काेटींचा जीएसटी बुडवला, पुण्यातल्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत कर बुडवणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने मुंबईत रविवारी सायंकाळी अटक केली. मोदसिंग पद्मसिंह सोढा असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. १० बनावट कंपन्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बिले तयार करून काळा पैसा निर्माण करूत ८० कोटी रुपयांचा कर बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. पुण्यातील न्यायालयाने सोढा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोण आहे सोढा?

पुण्याच्या अग्रगण्य व्यापाऱ्यांमध्ये सोढा यांची गणना केली जाते. सोढा यांची मुंबईतील सिपी टॅंक भागात स्क्रॅप आणि अलॉय मेटल्सची कंपनी आहे. याच कंपनीच्या माध्यमातून माल आणि त्याची बनावट बिले, तयार सोढा काळ्या पैशांची अफरातफर करत होते. सुमारे ४१५ कोटी रुपयांची बिले त्यांनी गेल्या वर्षी १ जुलैपासून तयार केली होती. त्याअंतर्गत सुमारे ८० कोटी रुपयांचा ‘जीएसटी’ त्यांनी बुडवला. पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून २ कोटी १८ लाख रुपयांचा ‘जीएसटी’ वसूल करण्यात आल्याची माहिती जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाकडून देण्यात आली आहे. 

देशभरात रॅकेट

देशाच्या वेगवेगळ्या भागांत सोढा यांचे बनावट ‘उद्योग’ सुरू असावेत, असा पुणे जीएसटी इंटेलिजन्स विभागाचा अंदाज आहे. तपासात आणखी काही व्यापाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. बनावट बिलांच्या माध्यमातून नेमके कोणाचे पैसे फिरविण्यात आले, त्यात कितीजण सहभागी आहेत, याबाबत सखोल तपास सुरू आहे. देशभरात सुरू असणाऱ्या या रॅकेटने सुमारे ९०० कोटी रुपयांची बनावट बिले तयार केल्याचा इंटेलिजन्स विभागाचा अंदाज आहे. विभागाने सोढा यांच्या राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंक खात्याचा तपास सुरू केला असून त्यातून मोठा गैरव्यवहार बाहेर पडू शकतो, असाही अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


हेही वाचा- 

कपड्याचं माप घेतना महिला डॉक्टरचा विनयभंग

नोकरीचं आमिष दाखवून १२ महिलांना परदेशात वेश्या व्यवसायात ढकललं


पुढील बातमी
इतर बातम्या