मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहला सशर्त जामीन

मालेगाव येथे सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाप्रकरणी तुरूंगात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. मात्र याच गुन्ह्यातील दुसरे प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन नाकारला आहे.

मालेगाव येथे सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना मुख्य आरोपी ठरवत अटक केली होती. तेव्हापासून हे दोघेही तुरूंगात होते. या दोघांनीही विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

या अर्जांवर मंगळवारी सुनावणी झाली तेव्हा उच्च न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सशर्त जामीन मंजूर केला मात्र त्याचवेळी दुसरे प्रमुख आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला.

मालेगाव येथे सन 2008 मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयए ने यापूर्वीच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरूद्ध सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत त्यांना क्लिनचीट दिली होती. याच मुद्द्यावर न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तसेच या प्रकरणाच्या तपासात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे.

काय आहे हे प्रकरण?
मालेगाव येथे 21 सप्टेंबर 2008 रोजी दोन बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जण ठार तर 79 जण जखमी झाले होते. जेव्हा हे दोन बॉम्बस्फोट झाले तेव्हा रमजान निमित्त जवळच्याच एका मशिदीतून लोक नमाज अदा करून परतत होते. दोन स्फोटांपैकी एका स्फोटाच्या ठिकाणी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या मालकीची स्कूटर सापडली होती. या गुन्ह्याच्या तपासात प्रथमच हिंदू दहशतवादाचा धागा समोर आला होता. तपासादरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ती स्कूटर खूप आधीच विकली असल्याचे निष्पन्न झाले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या