तरुणीने केली भावाची हत्या

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

धारावी - बहिणीने सख्ख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना धारावीतल्या सोशलनगरमधील नूर चाळीत गुरुवारी घडली. या घटनेत इस्माईल सैफन मुल्ला (32) जागीच ठार झाला असून या हत्येप्रकरणी धारावी पोलिसांनी शिरीन सैफन मुल्ला (20) या तरुणीला अटक केली आहे.

गुरुवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास मद्यधुंदावस्थेत असलेल्या इस्माईलने बहीण शिरीनला शिवीगाळ करत घराबाहेर काढू लागला. त्यामुळे शिरीनचे त्याच्याशी कडाक्याचे भांडण लागले. वैतागलेला छोटा भाऊ इब्राहिमने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली असता इस्माईलने त्याचा गळा दाबला. हे पाहून शिरीन छोट्या भावाला सोडवण्यासाठी सरसावली मात्र काही केल्या इस्माईल गळा सोडत नसल्याने आपल्या छोट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी शिरीनने इस्माईलच्या छातीत चाकूने वार केला. तेव्हा इस्माईल जागीच कोसळला. तोपर्यंत शेजाऱ्यांनी घराबाहेर एकच गर्दी केली होती. त्यावेळी तात्काळ शिरीनने छोटा भाऊ आणि शेजाऱ्यांच्या मदतीने इस्माईलला शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी धारावी पोलिसानी शिरीन सैफन मुल्ला विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या