दहावी पेपरफुटीचंं औरंगाबाद कनेक्शन

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

दहावी पेपरफुटी प्रकरणी अंबोली पोलिसांनी औरंगाबादच्या एका शिक्षकाला गुरूवारी अटक केली. आतिश अशोक कदम (३२) असं या शिक्षकाचं नाव आहे. ठाणे, मुरबाड आणि उल्हासनगरहून आलेल्या २६ मुलांना औरंगाबाद येथून परीक्षा देण्यासाठी मदत केल्याप्रकरणी आतिशला अटक केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी न्यायालयाने आतिशला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

'ढ' विद्यार्थ्यांसाठी

या प्रकरणातील मुख्य आरोपी फिरोज खान अभ्यासात 'ढ' असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या खासगी कोचिंग क्लासच्या मदतीने चांगले मार्क मिळवून देण्याचा दावा करायचा. त्यासाठी फिरोजने औरंगाबादचा शिक्षक आतिश कदम याची मदत घेतली होती.

फक्त परीक्षेसाठी औरंगाबदला

आतिशच्या मदतीने औरंगाबादच्या शाळेत फिरोजने २६ विद्यार्थ्यांचं अॅडमिशन करून घेतलं होतं. वर्षभर शाळेत न जाता केवळ परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना औरंगाबादला पाठवलं जायचं. पोलिसांनी काही संशयित विद्यार्थ्यांकडे केलेल्या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला.

फिरोजची शक्कल

त्यानुसार पोलिसांनी या पेपरफुटी प्रकरणात आतिशला औरंगाबादहून अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र या सर्वांमागे फिरोजची शक्कल असल्याची कबुली आतिशने पोलिसांना दिली.

या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून दिवसेंदिवस या प्रकरणाचं लोण वाढत असल्याचं दिसून येत आहे.


हेही वाचा-

पेपरफुटीचं खापर फक्त कोचिंग क्लासवर का?

पेपरफुटी करणारे क्लास होणार "ब्लॅकलिस्ट"


पुढील बातमी
इतर बातम्या