सोसायटीतील महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणारा अटकेत

सोसायटीतील महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या अविनाश कुमार यादव (३४) या तरूणाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना त्याच्याजवळील मोबाइलमध्ये २९४ अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळले आहेत. पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतलं असून तो पोलिस कोठडीत आहे. 

संशयास्पद फिरायचा

ठाण्याच्या कापूरबावडी परिसरातील एका नामांकीत सोसायटीत अविनाशने मे महिन्यात रुम भाड्याने घेतली होती. दोन ते तीन महिन्यांपूर्वी तो त्या रूमवर पत्नीसह रहायला आला होता. आयआयटी दिल्लीतून शिक्षण पूर्ण करून तो आयआयटी मुंबईत पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी आल्याचं समजतं.  रात्री - अपरात्री सोसायटीच्या परिसरात तो संशयास्पद फिरायचा. त्यामुळे सोसायटीत रहायला आल्यापासूनच अविनाश अनेकांच्या डोळ्यात आला होता.

रंगेहाथ पकडलं

 शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास अविनाश सोसायटीच्या मागील बाजूला येरझऱ्या घालत होता. काही वेळाने तो सोसायटीतल्या तळमजल्यावरील एका घरातील बाथरूमची लाइट लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन मोबाइलने व्हिडिओ चित्रीकरण करू लागला. त्यावेळी त्याच्या मोबाइलची फ्लॅश लाइट सुरू राहिल्यामुळे बाथरूममधील व्यक्तीला ही बाब लक्षात आली. त्या व्यक्तीने आरडाओरडा केला. त्यावेळी सोसायटीतील सुरक्षा रक्षक आणि नागरिकांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अविनाशला रंगेहाथ पकडलं.

पोलिसांना पाचारण

 त्याचा मोबाइल तपासला असता त्याच्या मोबाइलमध्ये सोसायटीतील काही महिलांचे अश्लील व्हिडिओ होते.  सोसायटीतील नागरिकांनी तातडीने कापूरवाडी पोलिसांना पाचारण केलं. पोलिस तपासात अविनाशच्या मोबाइलमध्ये २९४ अश्लील व्हिडिओ, फोटो आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी अविनाश विरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 


हेही वाचा - 

अमेरिकन नागरिकांना ३८ लाखांचा गंडा

सव्वा सात कोटींचा सीमाशुल्क बुडवला; व्यावसायिकाला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या