पोलिसांच्या डोळ्यात माती फेकून पलायन

लघुशंकेचं कारण सांगून पोलिसांच्या डोळ्यात माती फेकत सोमवारी न्यायालयातून कुख्यात गुंड सुरेश पुजारीच्या दोन हस्तकांनी पलायन केलं होतं. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना जेरबंद केलं. अली अब्बाज खान (२९) अाणि राज शेषराज चौहान उर्फ सुनील (२५) अशी या अारोपींची नावं अाहेत. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौचालयातून अाणली माती

सुरेश पुजारीसाठी अली व सुनील हे दोघे काम करतात. उल्हासनगरमध्ये एका खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना सुरतहून अटक केली आहे. त्यांच्यावरील गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवला अाहे. त्यानंतर दोघांची रवानगी न्यायालयानं भायखळाच्या आर्थर रोड कारागृहात करण्यात अाली. सोमवारी दोघांना सुनावणीसाठी सीएसटीच्या एस्प्लानेड न्यायालयात आणण्यात आलं  होतं. यावेळी दोघांनी लघुशंका आल्याचं सांगितलं.

 दोघांनी शौचालयातून परतल्यानंतर तेथून मूठभरून आणलेली माती सोबत आलेल्या पोलिसांच्या डोळ्यात फेकली. डोळ्यात माती गेल्याने पोलिस डोळे चोळत होते. त्यामुळे दोघांनी त्यांच्या हाताला झटका देत पळ काढला. मुसळधार पावसात पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पण, ते हाती सापडले नाहीत. मात्र, मोठ्या शर्थीने पोलिसांनी अवघ्या काही तासात त्यांना अटक केली. 

आर्थर रोडमध्ये रवानगी

दोघांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं अाहे. पोलिसांच्या ताब्यातून पलायन केल्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात या दोन आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ३५३, ३२४, २२४, ३३२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा -

कुटुंब रंगलंय चोऱ्यांमध्ये!


पुढील बातमी
इतर बातम्या