बेदरकारपणे गाडी चालवत अाॅटोरिक्षाला धडक दिल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा गायक अादित्य नारायणवर गुन्हा नोंदवत अटक केली अाहे. या दुर्घटनेत अाॅटो रिक्षामधील एक महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली अाहे. तिला उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात अालं अाहे.
अंधेरी लोखंडवाला काॅम्प्लेक्सच्या बॅकसाईडच्या मार्गावरून अादित्य नारायण भरधाव वेगात गाडी चालवत निघाला होता. हा रस्ता तसा निर्जन असल्यामुळे तो सुसाट गाडी चालवत होता. एका वळणावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले अाणि त्याने रिक्षाला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले अाहे.
रिक्षातील महिला गंभीर जखमी
या रिक्षातून प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली अाहे. तर रिक्षाचालकाला किरकोळ मार लागला अाहे. दोघांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात अाले अाहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अादित्य नारायणला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली अाहे.