महिलांच्या डब्यात घुसून तरूणाचे अश्लिल चाळे, तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार

मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर महिलांच्या डब्यात घुसून एका तरुणानं डब्यातील महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वरून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी लोकलमधील प्रवाशांनी पोलिसांत या घटनेची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित महिला प्रवाशाने तक्रार दाखल केली नसल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. असं या घटनेचा साक्षीदार असलेल्या प्रवाशाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेमकं प्रकरणं काय?

शुक्रवारी दुपारी २ वाजून ४२ मिनिटांनी हार्बर रेल्वे मार्गावरून 'सीएसएमटी'हून पनवेलला जाणारी लोकल सुटली. ही लोकल सुटताच या लोकलच्या महिलांच्या डब्यात एक तरूण चढला. लोकल 'सीएसएमटी' स्थानकातून बाहेर पडताच फर्स्ट क्लासच्या डब्यातून एका महिलेचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी महिलांच्या बाजूच्या डब्यातून प्रवास करणारे जितेश उतेकर या प्रवाशाने त्या डब्यात एक तरूण महिलेच्या बाजूला बसून अश्लिल चाळे करत असल्याचं पाहिलं.

लोकलमधून उडी मारून फरार

उतेकर आणि इतर प्रवाशांनी आरडाओरड केल्यावर हा तरूण महिलेजवळून बाजूला झाला आणि दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिला. त्यानंतर मस्जिद बंदर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून उडी मारत तो तेथून फरार झाला.

'सीएसएमटी'पोलिसांकडे पाठवलं

महिलेनं घडलेला सर्व प्रकार जितेश उतेकर यांना सांगितला. परंतु त्या घाबरलेल्या असल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल न करताच तिथून निघून गेल्या. याप्रकरणी जितेश यांनी महिलेला मदत करण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपी हेल्पलाईन नंबरला संपर्क केला आणि वडाळा रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार 'सीएसएमटी' स्थानकात घडल्याने 'सीएसएमटी' रेल्वे पोलिसांत तक्रार करा, असं वडाळा पोलिसांनी त्यांना सांगितलं.

तक्रार नोंदवण्यास नकार

त्यानुसार उतेकर 'सीएसएमटी' रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले, त्यांनी विकृत तरूणाचा फोटो देखील पोलिसांना दिला. मात्र, पोलिसांनी ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे, त्या व्यक्तीनं तक्रार दाखल न केल्यामुळे तक्रार नोंदवण्यास नकार दिला, असं उतेकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यानंतर उतेकर यांनी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांना मेसेजद्वारे सर्व घटना कळवली. त्यानंतर पोलिसांनी 'सीएसएमटी' आणि मस्जिद बंदर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केल्याचं उतेकर यांनी फेसबूक पोस्टवर म्हटलं आहे.


हेही वाचा-

गुंतवणुकीवर दुप्पट आमिष दाखवून शेकडोंना कोट्यवधी रुपयांचा गंडा

किकी चॅलेंज करणाऱ्या तिघांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या