मुंबईत एका मागोमाग एक घोटाळे पुढे येऊ लागल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या उद्योगपत्यांच्या मुस्क्या आवळण्यास ईडीने सुरूवात केली आहे. येस बँक गैरव्यवहारानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ११ मोठ्या उद्योग समुहांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या ११ समुहांनी बँकेकडून ४२ हजार १३६ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले आहे. यामध्ये अनील अंबानी यांचा(एडीएजी)चाही समावेश असल्याने ईडीने या पूर्वीच त्यांना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनिल अंबानी गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.
यस बँकने बुडीत कर्जांमध्ये सर्वाधिक १२ हजार ८०८ कोटी रुपयांचे कर्ज प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांच्या अनिल धिरुभाई अंबानी समुहाला (एडीएजी) देण्यात आले. या समुहातील दहा कंपन्यांना हे कर्ज देण्यात आले. ती सर्व कर्जखाती बुडीत खात्यात गेली. यापाठोपाठ ८४१५ कोटी रुपये एस्सेल समुहाला देण्यात आले. समुहातील एकूण १६ कंपन्यांना कर्ज वाटप करण्यात आले. याखेरीज घोटाळा झालेली दिवाण हौसिंग फायनान्स कंपनी (डीएचएफएल), आयएल अॅण्ड एफएस समूह, इंडिया बूल्स, खेतान समूह यांचाही या बुडित कर्जखात्यांमध्ये समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी यस बँकेच्या कर्ज बुडव्यांमध्ये अनिल अंबानी, एस्सेल, आईएलएफएस, डीएचएफएल, आणि वोडाफोन यांचा समावेश होता. त्यातील वोडाफोनने टप्या टप्याने ६ हजार कोटी भरले.
हेही वाचाः- कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर
काही दिवसांपूर्वी रिलायन्स समूहाने सांगितले होते की येस बँकेचे कर्ज पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ते सामान्य व्यवसाय पद्धतीने घेतले गेले आहे. 'रिलायन्स ग्रुप आपल्या मालमत्तांच्या विक्रीतून येस बँक लिमिटेडकडून घेतलेले सर्व कर्ज परतफेड करण्यास वचनबद्ध आहे. त्याच बरोबर राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबधित असलेल्या गैरव्यवहाराशी रिलायन्सचा काहीही संबध नसल्याचे सांगितले होते. ईडी कार्यालयात आता अंबानी यांची कितीतास चौकशी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या पूर्वी एस्सेल समूहाचे सुभाष चंद्रा यांनी संसद सुरू असल्याचे कारण देत चौकशीला हजर न राहणार असल्याचे कळवले होते. तर जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी कुटुंबातील व्यक्तीच्या आजार पणाचे कारण पुढे करत हजर न राहणार अस्लयाचे कळवले.