Coronavirus Updates: शासकीय कार्यालयांसह शाळा-कॉलेजांमध्येही ५० टक्के उपस्थिती

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं राज्य सरकारनं कंपन्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड ५० टक्के कर्मचारी येतील अशा पद्धतीनं सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण विभागाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न कॉलेजे आणि शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती ठेवण्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कार्यालयातील महत्त्वाची व प्रलंबित कामं पार पाडण्यासाठी रोटेशन पद्धतीनं ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग बोलविण्याची जबाबदारी संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांची राहील, असे आदेश शिक्षण विभागानं जारी केले आहेत. मात्र, शिक्षकांना वर्क फॉर्म होम पद्धतीनं काम करू देण्याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.

मुंबई विद्यापीठानं संलग्न असलेल्या कॉलेजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची रोटेशन पद्धतीने ५० टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सुचना संस्थांना दिल्या आहेत. याबाबतचं परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असून, हा निर्णय ३१ मार्चपर्यत अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विभागांमधील परिस्थितीनुसार संस्थांना निर्णय घेण्याची मुभाही देण्यात आली आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: लोकलमधील भजनी मंडळींचा भजनं बंद करण्याचा निर्णय

Coronavirus Updates: सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय


पुढील बातमी
इतर बातम्या