मुलांनो, आता शाळेत प्या दूध

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • शिक्षण

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना पुन्हा एकदा सुगंधित दूध देण्याचा विचार सुरू आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये ‘महानंद’ दुग्धशाळेकडून यूएचटी टेट्रा दुधाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, याबाबत कोणताही निर्णय गटनेत्यांच्या सभेपुढे होऊ शकलेला नाही. पण पालिका शाळेत शिकणाऱ्या मुलांना पोषण आहार योजनेंतर्गत पुन्हा एकदा दूध मिळणार का सवाल उपस्थित होत आहे.

पुन्हा दूध पुरवठा होणार?

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादीत (महानंद दुग्धशाळा) चे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे यांनी महापालिकेला पत्र पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी शालेय पोषण आहार योजनेतंर्गत महापालिकेच्या शाळांमधील मुलांना ‘महानंद’ युएचएटी टेट्रा दुधाचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई महापालिकेने सन २००७-०८च्या शैक्षणिक वर्षांपासून सुगंधित दुधाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. पण विषबाधेचा प्रकार समोर आल्यानंतर दुधाचा पुरवठा बंद करण्यात आला होता. आता मात्र ‘महानंद’ने अशाप्रकारचे पत्र पाठवून पुन्हा एकदा दूध पुरवठा करण्याची तयारी दर्शवल्यामुळे मुलांना शाळेय पोषण आहारांतर्गत पुन्हा एकदा दूध मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

काय म्हटलंय या पत्रात?

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादीत अर्थात ‘महानंद’ दुग्धशाळा ही महाराष्ट्रातील शेतकरी दूध उत्पादकांची प्राथमिक सहकारी दूध संस्था, तालुका आणि जिल्हाधिकारी दूध सहकारी संघाची राज्यस्तरीय शिखर संस्था आहे. यामध्ये ८५ सभासद संघ आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महानंदचा मोलाचा वाटा आहे. संस्थेचा महानंद या सुप्रसिद्ध ब्रँडने मुंबई, उपनगरे आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दूध पुरवठा केला जातो. ‘महानंद’मार्फत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की लस्सी, तूप, आम्रखंड, श्रीखंड, सुगंधी दूध तसेच टेट्राफिनो आणि टेट्राब्रिक मधील दूधाचा पुरवठा केला जातो. या ‘महानंद’चे स्वत:चा टेट्रापॅक यूएचटी दुधाचा प्रकल्प गोरेगावमध्ये असून भारतीय सैन्य दल, मुंबईतील नामांकित संस्थेला पुरवला जात असल्याचे या पत्राद्वारे ‘महानंद’ने कळवले आहे.

सन २०११मध्ये तत्कालिन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी जारी केलेल्या पत्रात शालेय पोषण आहारांतर्गत महानंदचे दूध शालेय विद्यार्थ्यांना पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ‘महानंद’ला विनानिविदा काम देण्याचे आदेश असून त्यानुसार महानंदने महापालिकेला आपल्या शाळांमध्ये मुलांना ‘महानंद’चे दूध पुरवण्याची मागणी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या