बीएमएमच्या परीक्षेत हॉलतिकीट गोंधळ

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि वेळापत्रक गोंधळ सुरू असतानाच आता नवीन हॉलतिकीट गोंधळही समोर आला आहे. मुंबईतील अनेक कॉलेजांमध्ये सध्या बीएमएमच्या पाचव्या सत्रातील परीक्षा सुरू असून पहिले २ पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच मिळालं नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर परीक्षा देता आली असली, तरी देखील त्या पेपरवेळी विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचा प्रश्न उद्भवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठाच्या बीएमएम अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राची परीक्षा १३ नोव्हेंबरपासून होणार होती. परीक्षेच्या आधी दिवाळीची सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरला हॉलतिकीट देण्यात येईल, असं सांगण्यात आलं होत. परंतु १० तारखेला विद्यापीठाकडून हॉलतिकीट प्राप्त न झाल्यानं १२ नोव्हेंबरला म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी हॉलतिकीट देण्यात येईल, असं कॉलेजकडून सांगण्यात आलं. त्या दरम्यानही विद्यार्थ्यांना हॉलतिकीट न देताच १३ नोव्हेंबरला परीक्षा केंद्रावरच हॉलतिकीट मिळतील, असं सांगण्यात आलं.

ओळखपत्रावर मुभा

१३ नोव्हेंबरला परीक्षेच्या अर्धा तास आधी संबंधित कॉलेजांनी एका पत्रात सर्व विद्यार्थ्यांचे सीट क्रमांक आणि नावे लिहून ते पत्र संबंधित केंद्र प्रमुखांकडे पाठवण्यात आलं. हे पत्र आणि आधार कार्ड, कॉलेज आयडी-कार्ड यांसारख्या वैयक्तिक ओळखपत्राच्या आधारावर विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मुभा मिळाली. अशाचप्रकारे विद्यार्थ्यांना दुसरा पेपरही विनाहॉलतिकीट द्यावा लागला. अखेर विद्यार्थ्यांना तिसऱ्या पेपरच्या आधी कॉलेजकडून हॉल तिकीट देण्यात आलं.

पुनर्मूल्यांकनात काय?

दरम्यान पेपरच्या पहिल्या दोन दिवशी संबंधित कॉलेजांनी पत्र पाठवून विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची सोय करण्यात आली असली, तरी देखील पहिल्या दोन पेपरदरम्यान हॉल तिकिटावर पर्यवेक्षकांची सही मिळाली नाही. आधीच परीक्षेचा ताण त्यात हॉलतिकीटवर पेपर दिल्याचा पुरावा नसल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे निकालानंतर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेसाठी हॉल तिकिटाची प्रत हजेरीचा पुरावा म्हणून जोडणं बंधनकारक आहे. तशी वेळ आल्यास काय करायचं? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.

विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटचा डेटा कॉलेजनं भरायचा असून त्यानंतर विद्यापीठाकडून हॉलतिकीट जनरेट करण्यात येतं. परंतु काही वेळा हा डेटा कॉलेजनं न भरल्यानं किंवा त्यात चुका झाल्यानं हॉलतिकीट जनरेट होण्यास वेळ लागतो. या विद्यार्थ्यांचं हॉलतिकीट जनरेट करण्यात आलं असून पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रात हजेरीपत्रक भरून घेतलं जात असल्यानं संबंधित केंद्रांकडेही हजेरीचा पुरावा असतो. त्यामुळं हॉलतिकीट न मिळाल्यानं विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारच्या नुकसान होणार नाही.

- विनोद मळाळे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ


हेही वाचा-

'लॉ'चे विद्यार्थी नवीन वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत

Mumbai Live IMPACT: विद्यापीठानं 'पेट' परीक्षा ढकलली पुढे


पुढील बातमी
इतर बातम्या