विद्यापिठातील मुलांच्या वसतीगृहात उपहारगृहातील कर्मचाऱ्यांचं वास्तव्य

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मुलांच्या वसतीगृहात उपहारगृहातील कर्मचारी वास्तव्यास असल्याचं उघडकीस आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं केलेल्या पाहणीत हे धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे. 

तोंडी आश्वासन 

कलिना कॅम्पसमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हे मुलांसाठी एकमेव वसतीगृह अाहे.  यात ८० खोल्या असून पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी इथं राहतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी बांधकाम सुरू असून हे काम गेल्या वर्षी पूर्ण होणं आवश्यक होतं. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालं नसून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत अाहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली असता, वसतीगृह लवकरात लवकर सुरू होईल असं तोंडी आश्वासन देण्यात अालं होतं. 

वसतीगृहाला तडे 

याबाबत आक्रमक पावित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं मुंबई विद्यापीठाचं रानडे भवन व कर्मवीर भाऊराव पाटील मुलांच्या वसतीगृहाची पाहणी केली. यावेळी ही दोन्ही  वसतीगृह अत्यंत भयावह परिस्थितीत असून या इमारतीला तडे गेल्याचं अाढळून अालं अाहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी वायर लटकत असून छताचं प्लास्टरही निघालं आहे. विशेष म्हणजे  वसतीगृहाचं डागडुजीकरणाचं काम सुरू असताना त्या ठिकाणी उपहारगृहातील कर्मचारी वास्तव्य करीत असल्याचं धक्कादायक वास्तव्य या पाहणीवेळी उघडकीस आलं. 

विद्यार्थिनी जखमी

काही दिवसांपूर्वी रानडे भवनचा स्लॅब कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या बांधकाम विभागावर तात्काळ कारवाई होणं आवश्यक होतं. मात्र, अद्याप विद्यापीठाला जाग आली नसून विद्यापीठ प्रशासन आणखी विद्यार्थी जखमी होण्याची वाट पाहत अाहे का? असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड अमोल मातेले यांनी केला आहे. 


हेही वाचा - 

विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमधील उपहारगृहाची दुरावस्था

मुंबई विद्यापीठाचा स्लॅब कोसळला, ३ विद्यार्थीनी जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या