नव्या कुलगुरूंचंही 'टार्गेट रिझल्ट'

'लॉ' च्या विद्यार्थ्यांसह इतर शाखांचे निकाल येत्या काही दिवसांत लावण्यात येतील, अशी घोषणा मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केली. तसंच आतापर्यंत रखडलेली सर्व कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

शिक्षणमंत्र्यांनी घेतली भेट

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शुक्रवारी रुईया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती केली. त्यानंतर शनिवारी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. हा कार्यभार स्वीकारल्यानंतर ३० एप्रिलला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची भेट घेत विविध शैक्षणिक घडामोडींविषयी चर्चा केली.

लवकरात लवकर निकाल

या चर्चेदरम्यान कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मी नुकताच कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला असून माझे पहिलं टार्गेट विद्यापीठाची रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि लॉ सह इतर रखडलेले निकाल लवकरात लवकर लावणे हे असल्याचं स्पष्ट केलं.

प्राचार्यांमध्ये उत्साहाचं वातवरण

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रुईया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठ संलग्नित सर्व कॉलेजांमधील प्राचार्यांमध्ये उत्साहाचं वातवरण बघायला मिळत आहे. या निवडीमुळे विद्यापीठात कार्यरत असलेले दोन प्रमुख प्राचार्यगट लवकरच एकत्रित काम करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे याचा फायदा विद्यापीठाचे रखडलेले निकाल वेळच्या वेळी लावण्याच्या कामासाठी होणार असून यामुळे परीक्षा विभागाच्या कामकाजही वेळवर होईल. असंही सांगितलं जात आहे.

डाॅ. पेडणेकर मुंबई विद्यापीठाचा घसरलेला गाडा मार्गावर आणतील आणि मुंबई विद्यापीठाची जुनी शान परत घेऊन येतील. राज्य शासन विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही. त्यांना काम करण्यास पूर्णत: मोकळीक असेल.

- विनोद तावडे, शिक्षणमंत्री


हेही वाचा-

निकाल गोंधळ पूर्णपणे निस्तरणं हे पहिलं ध्येय - कुलगुरू

जाणून घ्या, कोण आहेत डॉ. सुहास पेडणेकर?


पुढील बातमी
इतर बातम्या