गेल्या काही दिवसात मराठा आरक्षण आंदोलनामुळं राज्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यानं अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळं इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या जवळपास २ हजार ३४४ विद्यार्थ्यांना ऑनलाईन जातप्रमाणपत्र सादर करता आलं नाही.
नुकतंच तंत्रशिक्षण संचालकाकडून ऑनलाईन जातप्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून येत्या १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र सादर करता येणार आहे. तंत्रशिक्षण संचालकांनी घेतलेल्या या निर्णयामुळं इंजिनिअरींगच्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मे महिन्यात सीईटीची परीक्षा पार पडल्यानंतर ७ ऑगस्टपासून इंजिनिअरींगच्या प्रवेशप्रक्रियेला सुरूवात झाली होती. मात्र, मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर असल्यानं अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला होता. तसंच काही भागात चुकीचे मेसेज पसरू नये या हेतूनं इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन जातप्रमाणपत्र सादर करता आले नाहीत. त्यातच जात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्याची मुदत १० ऑगस्टपर्यंत असल्यानं अनेक विद्यार्थ्यांपुढं प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
मुदतवाढीस मान्यता
सीईटीमार्फतची प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत करण्यात येते. परंतु, ऑनलाईन जातप्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपल्यानं २ हजार ३४४ विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. तंत्रशिक्षण संचालनालयाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं प्रवेश नियामक प्राधिकरणाकडं मुदतवाढ देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करत १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
हेही वाचा -
विद्यार्थी म्हणतात, 'आम्हाला हवंय प्लास्टिकपासून स्वातंत्र्य!'
'यूजीसी'चा 'तो' निर्णय रद्द करा' - आदित्य ठाकरे