राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी राज्य सरकारने नव्या पध्दतीनं बृहत आराखडा तयार करण्याचं निश्चीत केलं आहे. त्यानुसार विद्यार्थी, पालकांसह इतर तज्ज्ञांकडूनही मते मागवण्यात येणार अाहेत. त्यासाठी मुंबई विद्यापीठानं एक वेबसाइट जाहीर केली आहे. या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना बृहत आराखड्याबाबत सूचना करता येणार अाहेत. या आराखड्यातील सर्वेक्षण प्रश्नावली विद्यापीठाच्या https://muonline.org.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
काय असणार बृहत आराखड्यात
मुंबई विद्यापीठाचा सन २०१९-२० ते २०२३-२४ असा पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये विविध अभ्यासक्रम आणि ठिकाणं समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रात नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम, प्रस्तावित ठिकाणांच्या शैक्षणिक गरजा, भौगोलिक परिसर, लोकसंख्या, सामाजिक परिस्थिती इत्यादींचा विचार करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत.
डॉ. नरेंद्र जाधव समितीने केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने व बदलते तंत्रज्ञान, काळाची गरज, आदिवासी, डोंगराळ / दूर्गम भागातील गरजा आणि अडचणी यांचा विचार करून या सूचना मागवल्या अाहेत. व्यवसाय तथा रोजगारभिमूख अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यासाठी विद्यार्थ्यांसह समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचं सक्रीय योगदान प्राप्त करण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमच सविस्तर सूचना मागविल्या जात आहेत. ही प्रश्नावली दहा विभागात विभागली असून त्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार वेबसाइटवर त्याची माहिती देण्यात आली आहे.
विद्यापीठ शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. गेल्या दोन दशकांत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वच क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. याच बदलांना अनुसरून शिक्षणाची गरज असून विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास होण्याच्या दृष्टीनं हे नवीन पाऊल उचलण्यात आलं आहे.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
हेही वाचा -
महापालिका शाळांमध्ये संगीतासह नृत्याचेही धडे