गेल्या अनेक वर्षांपासून विविध शाळा, कॉलेज, आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विविध ग्रंथपालांना पूर्णवेळ नेमण्याची मागणी अनेक ग्रंथपालांतर्फे करण्यात येत आहे. अखेर काही दिवसांपूर्वी राज्यातील १६५१ अर्धवेळ ग्रंथपालांपैकी आता ५९६ ग्रंथपालांना पूर्णवेळ नियुक्त करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला अाहे.
पदं रिक्त
राज्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये २ हजार ४०९ पूर्णवेळ तर २ हजार ३२२ अर्धवेळ ग्रंथपालांची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या १८१३ पूर्णवेळ तर १६१५ अर्धवेळ ग्रंथपाल कार्यरत असून ५९६ पूर्णवेळ ग्रंथपाल पदं रिक्त आहेत. अर्धवेळ ग्रंथपालांना सेवा संरक्षण नसल्यानं व सेवेतील इतर लाभ मिळत नसल्याने समन्यायिक तत्त्वानुसार अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
४५ दिवसांत नियुक्ती
ही नियुक्ती करताना सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन सूची तयार करावी व त्यासाठी सर्वात आधी ऑनलाइन अर्ज मागवावेत, अशी सूचना यामध्ये करण्यात आली आहे. ही माहिती ग्रंथपालांनी स्वत: अपलोड करून प्रमाणित करावी, यानंतर मुख्याध्यापकांनी ती प्रमाणित करून शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावी. संचमान्यता झाल्यानंतर ४५ दिवसांत त्यांची जागा उपलब्धतेनुसार नियुक्ती केली जाईल, असं या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील अनेक अर्धवेळ काम करणाऱ्या ग्रंथपालांना दिलासा मिळणर आहे.
हेही वाचा -
शिक्षक दिन: शिक्षक-विद्यार्थी नात्याचा बदललेला परिघ