गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या राज्य शिक्षण मंडळाचा बारावी बोर्डाचा निकाल बुधवारी ३० मे रोजी जाहीर झाला आहे. हा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना आज दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या www.mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
राज्याचा बारावीचा निकाल यंदा ८८.४१ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल ८७.४४ टक्के इतका लागला असून २ लाख ७२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान मुंबई विभागातून ३ लाख ११ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर राज्यात एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण ९२.३६ टक्के असून मुलांचं प्रमाण ८५.२३ एवढे टक्के आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.
शाखा | परीक्षेला बसलेले विद्यार्थी | उत्तीर्ण | टक्केवारी |
---|---|---|---|
विज्ञान | ५ लाख ६४ हजार ४२९ विद्यार्थी | ५ लाख ४० हजार ५६३ विद्यार्थी | ९५.८५ % |
कला | ४ लाख ४७ हजार ४६८ विद्यार्थी | ३ लाख ५२ हजार ५१५ विद्यार्थी | ७८.९३ % |
वाणिज्य | ३ लाख ५२ हजार ४२५ विद्यार्थी | ३ लाख १५ हजार १९२ विद्यार्थी | ८९.५० % |
मॅनेजमेंट | ५४ हजार ३२३ विद्यार्थी | ४४ हजार ५४८ विद्यार्थी | ८२.१८% |
नऊ विभागांचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेतील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांचा निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात आला आहे.
http://www.knowyourresult.com/
दरम्यान वर दिलेल्या वेबसाईटवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेचा बैठक क्रमांक, त्यानंतर तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं कॅपिटलमध्ये टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. तसेच या निकालाची प्रिटंआऊटही तुम्हाला काढता येईल.
बीएसएनएल ग्राहकांनी ५७७६६ या क्रमांकावर MHHSC टाईप करा. स्पेस द्या. त्यानंतर आसन क्रमांक टाका आणि ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस पाठवल्यावर त्यांना त्यांचा निकाल प्राप्त होईल.
यंदाच्या या परीक्षेकरता राज्यातील १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिला असून त्यातील ८ लाख ३४ हजार १३४ विद्यार्थी तर ६ लाख ५० हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. या परीक्षेतील विज्ञान शाखेकरता ५ लाख, ८० हजार, ८२० विद्यार्थी, वाणिज्य शाखेकरता ३ लाख ६६ हजार ७५६ विद्यार्थी, कला शाखेकरता ४ लाख, ७९ हजार, ८६३ विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता ५७ हजार ६९३ विद्यार्थी बसले होते.