SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना 'या' तारखेपासून मिळणार हॉल तिकीट

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता परीक्षा जवळ आल्याने हॉल तिकीट कधी मिळणार हे जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी बोर्ड परीक्षा राज्य मंडळातर्फे 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत घेतली जाईल. या परीक्षेसाठी हॉलतिकीट कधी उपलब्ध होणार हे मंडळाने जाहीर केले आहे. हॉल तिकीट ऑनलाइन मोडद्वारे डाउनलोड केले जाऊ शकते.

हॉल तिकीट कधी आणि कुठे डाउनलोड करता येईल?

दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या परीक्षांसाठी हॉल तिकीटही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी बुधवार 31 जानेवारी 2024 पासून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतील.

सर्व माध्यमिक शाळांच्या मार्च 2024 च्या परीक्षेसाठी प्रवेशपत्रे अर्थात हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करता येतील. हॉल तिकीट बोर्डाच्या https://www.mahahsscboard.in/ या वेबसाइटवरून 'शाळा लॉगिन' अंतर्गत डाउनलोड करता येईल.

परीक्षा कधी होणार?

बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात आल्या होत्या. इयत्ता 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांद्वारे चालवले जाईल.


हेही वाचा

SSC, HSCचे प्रात्यक्षिक गुण ऑनलाइन अपलोड होणार

मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या

पुढील बातमी
इतर बातम्या