जेईई, नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी शिकवणी

इंजिनीअरींग, मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक असलेले लाखो विद्यार्थी जेईई व नीट प्रवेश परीक्षा देत असतात. परंतु या परीक्षांच्या खासगी कोचिंग क्लासची फी परवडणारी नसल्यानं पैशांअभावी अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांकरीता मोफत शिकवणी सुरू करण्याच निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा बऱ्याच गरीब विद्यार्थ्यांना होणार आहे.

कधी सुरू होणार?

येत्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून हा नवा निर्णय लागू होणार असून यामुळं खासगी कोचिंग क्लासला चांगला फटका बसणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जेईई-मेनची सराव परीक्षा घेतली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी उच्च शिक्षण संस्थांमधील पदवी प्रवेशांच्या आयोजनासाठी केंद्र सरकारनं 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' स्थापन केली होती. त्यानुसार २ हजार ६९७ केंद्राचं रुपांतर पुढील वर्षीपासून प्रशिक्षण केंद्रात करण्यात येणार असून येत्या ८ सप्टेंबरपासून या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

नोंदणी कधीपासून?

या सरकारी शिकवणीठी करण्यात येणारी नोंदणी येत्या १ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. तर याच दिवशी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी अॅप' आणि वेबसाईटचं उद्घाटन करण्यात येणार आहे. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे.

तज्ज्ञ शिक्षकही असतील

पहिल्या टप्प्यात 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'तर्फे जेईई मेन्सच्या विद्यार्थ्यांची सराव चाचणी घेतली जाणार आहे. अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. जे विद्यार्थी अॅप व वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी करतील त्यांना ही चाचणी देता येईल. तसंच चाचणीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकही सेंटरवर कार्यरत असतील. नीट व जेईईसाठीची ही शिकवणी येत्या मे महिन्यापासून सुरु होणार आहे.


हेही वाचा-

नीट परीक्षा वर्षातून एकदाच; केंद्र सरकारचा यू-टर्न

दहावी फेरपरीक्षेत मुंबईचा निकाल सर्वात कमी!


पुढील बातमी
इतर बातम्या