राज्यातील कॉलेज शिक्षकांची जेलभरो आंदोलनाची हाक!

राज्य शासनाने शिक्षक भरतीवर पूर्णपणे बंदी घातल्याने सध्या उच्च शिक्षण क्षेत्रात बऱ्याच जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्व रिक्त पदांवर लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करावी. यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) च्या वतीन येत्या मंगळवारी मुंबईत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये जेलभरो आंदोलनाला सुरूवात होणार असून यात जवळपास १० हजार शिक्षक सहभागी होणार आहेत.

बंदीचा काय परिणाम?

महाराष्ट्र शासनानं २५ मे २०१७ साली जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार सध्या शिक्षक भरतीवर पूर्णपणं बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं सध्या विविध कॉलेजमध्ये कंत्राटी पदावर शिक्षकांची भरती केली जात आहे. अशा कंत्राटी शिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी सुट्ट्या, नियमित वेतन, पेन्शन यांसारख्या गोष्टींची सुविधा दिली जात नाही. तसंच या सर्व शिक्षकांना फक्त ६ हजार ते १८ हजार किंवा तासिका तत्वावर प्रती तास ३०० रुपयांप्रमाणे वेतन दिलं जात.

इतर कामांची सक्ती

याशिवाय एका शिक्षकाला १२० ते १३० विद्यार्थ्यांचे पेपर सेट करणं, तपासणं यांसारखीही कामे करावी लागतात. त्यामुळं समान काम-समान वेतन या सुप्रीम कोर्टाची निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करत त्यांना पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे कंत्राटी शिक्षकांनाही सरकारी सेवेत समाविष्ट करण्यात यावं ही प्रमुख मागणी 'एमफुक्टो'च्या वतीनं करण्यात येत आहे.

'या' मागण्याही मान्य करा

त्याशिवाय राज्यातील शिक्षकांच ७१ दिवसाचं वेतन त्वरित देऊन सर्व ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण संचालक यांच्यासह सर्व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील सर्व शिफारसी लागू कराव्यात. तसंच जुनी पेन्शन योजना सुरू करून नवी पेन्शन योजना बंद करावी, युजीसाच्या नियमानुसार सर्व शिक्षकांना सेवानिवृत्तीचं वय वाढवून द्यावं यांसारख्या मागण्याही 'एमफुक्टो'च्या वतीनं करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात नेट व सेट या परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी सध्या नोकरी नसल्यानं कंत्राटी पदवार काम करत आहेत. तसंच या सर्व शिक्षकांना अवघं १० ते २० हजार वेतन मिळत असून जवळपास १२० ते १३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक काम करत आहे. विशेष म्हणजे युजीसीच्या नियमावलीनुसार, प्रत्येक शिक्षकामागे फक्त २० विद्यार्थी असं गुणोत्तर प्रमाण असूनही शासनस्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळं येत्या मंगळवारी, ४ ऑगस्टला राज्यातील जवळपास १० हजार कॉलेज शिक्षक मुंबई विद्यापीठाच्या गेटवर जेल भरो आंदोलन करणार आहेत. तसंच या आंदोलनानंतर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ११ सप्टेंबरला एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल.

– प्रा. डॉ. तप्ती मुखोपाध्याय अध्यक्ष, एमफुक्टो


हेही वाचा-

विद्यापीठांचा दर्जा सुधारण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक

'यांच्या' सोयीसाठी कॉलेजात वर्षभरात फेरबदल करा - हायकोर्ट


पुढील बातमी
इतर बातम्या