'एमपीएससी'च्या परीक्षा स्थगित करा

कोरोना या साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठीच्या इपिडेमिक अँक्ट,१८९७ या कायद्याची अमलबजावणी राज्यात करण्यात येत असून त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील एमपीएससीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत.

राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २0२0 पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवलेले आहे. या पत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की, कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

सहलींवर ही बंदी

राज्यभरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निबर्ंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. या नियमाचे पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ मार्चपयर्ंत हे निबर्ंध कायम राहणार आहेत. कोरोना व्हायरस फैलाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोणालाही अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्याची गरज भासल्यास मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या