मुंबई विद्यापीठ परीक्षेचा निकाल किंवा वेळापत्रकाच्या गोंधळाचा सर्वप्रथम फटका विद्यार्थ्यांना बसतो. अनेकदा समन्वय न साधल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ नुकसानं होतं. या सर्वांवर उपाय म्हणून विद्यापीठ प्रशासनानं नुकतचं विद्यार्थ्यांसाठी mum-e-suvidha हे मोबाइल अॅप सुरू केलं. परंतु विद्यार्थ्यांनी या अॅपकडे दुर्लक्ष केलं असून फक्त एक हजार विद्यार्थ्यांनीच हे अॅप डाऊनलोड केलं आहे. विशेष म्हणजे अनेकांनी या अॅपला पाच स्टारपैकी फक्त एक स्टारच रेटिंग दिलं आहे.
माहिती, सूचना अॅपमधून
पहिल्या टप्यात ६ लाख विद्यार्थी व ७९१ कॉलेजांना जलद संवादाचं माध्यम म्हणून एमकेसीएलच्या मदतीनं mum-e-suvidha मोबाइल अॅप सुरू करण्यात आलं अाहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची सर्व माहिती व सूचना या अॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर मिळेल अस सांगण्यात आलं होतं. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेशापासून ते परीक्षेच्या प्रवेशपत्रापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे अॅप जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करावं यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर या अॅपची लिंक आणि इतर आवश्यक माहितीदेखील पाठवली होती. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी या अॅपचा वापरच केलेला नसल्याचं दिसून अालं अाहे.
mum-e-suvidha या अॅपमध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पीआरएन म्हणून १६ अंकी क्रमांक युजर आयडी म्हणून दिला असून याचा पासवर्ड विद्यार्थ्यांना कॉलेजच्या माध्यमातून देण्यात येतो. तसंच जर एखादा विद्यार्थी पासवर्ड विसरला असेल तर विद्यापीठाच्या डिजिटल युनिव्हर्सिटी वेबसाईटवरून फॉरगॉट पासवर्डच्या माध्यमातून त्याला पासवर्ड मिळवता येईल. या मोबाइल अॅपमधून महाविद्यालये, विद्यार्थ्यांना प्रवेश आणि परीक्षासंदर्भात विविध सुविधा उपलब्ध होत असून परीक्षेच्या तारखा, परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीटही मिळेल.
समन्वय राखण्यास मदत
महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना विविध सूचना या अॅपमार्फत पाठवता येणार असून विद्यापीठालाही महाविद्यालयांना या अॅपमार्फत विविध सूचना देता येतात. महाविद्यालयास या अॅपमधून प्रवेश व परीक्षासंबंधीची सर्व माहिती मिळते. परिणामी विद्यापीठ, महाविद्यालय अाणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय राखण्यास मदत होणार आहे. मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या या अॅपबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसून अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठानं डाऊनलोड करण्याची लिंकच पाठवलेली नाही. त्यामुळं विद्यापीठाचं अॅप डाऊनलोड कसं करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठानं सुरू केलेल्या अॅपसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर मेसेज व माहिती पाठवण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढेल. तसंच हा प्रतिसाद वाढवण्यासाठी विद्यापीठाकडून आवश्यक ती पावलं उचलली जाणार असून विद्यापीठ प्रशासनाकडून पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांच्या क्रमांकावर मेसेज पाठवण्यात येतील.
- डॉ. लीलाधर बनसोड, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ
हेही वाचा -
'लॉ'च्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश, अनेक विद्यार्थी चिंताग्रस्त
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी जागा अधिक विद्यार्थी कमी