पीएचडी प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन

मुंबई विद्यापीठाद्वारे घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) यंदा प्रथमच ऑनलाईन घेण्यात येणार असून रविवारी १६ डिसेंबर रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

यूजीसीचे निर्देश

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) २०१६ च्या नवीन निर्देशानुसार विद्यापीठाने नुकतच पीएचडी व एमफील प्रवेशासंदर्भात कुलगुरूंचे निर्देश प्रसिद्ध केले होते. यानुसार २०१८ पीएचडी व एमफील प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ६ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेसाठीचा अर्ज व परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून 'पेट' परीक्षेचं प्रवेशपत्र १० डिसेंबर पासून उपलब्ध होणार आहे.

कागदपत्रांची आवश्यकता नाही

या 'पेट' परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन असणार असून त्याची कोणतीही प्रत विद्यापीठात जमा करण्याची अावश्यकता नाही. या परीक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतेही कागदपत्रं सादर करण्याची आवश्यकता नसून विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्रता पाहूनच प्रवेश अर्ज करावे. तसंच अर्ज भरून झाल्यानंतर त्याची पुढील संदर्भासाठी प्रिंटआऊटही काढून ठेवावी.

७८ विषयांचा समावेश

'पेट' परीक्षा ४ विद्याशाखातील ७८ विषयांमध्ये घेतली जाणार असून हे विषय विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. www.mu.ac.in या विद्यापीठाच्या वेबसाईटवर ६ नोव्हेंबर अर्ज उपलब्ध असणार आहे. ही पेट परीक्षा ऑनलाईन असून संशोधन पद्धती व विद्यार्थ्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विषयावर आधारित असणार आहे.


हेही वाचा-

अतिरिक्त गुणांपासून हजारो विद्यार्थी वंचित; उच्च शिक्षण, नोकरीची संधी हुकली

पेपर तपासणीच्या कामात एकसमानता येणार


पुढील बातमी
इतर बातम्या