विद्यार्थी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर, ३० ऑगस्ट रोजी निवडणूक

मुंबई विद्यापीठानं महाविद्यालय आणि विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या निवडणुकीची आचारसंहिता २० आॅगस्टपासून लागू होणार आहे. तसंच, मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ३० ऑगस्ट रोजी प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान घेण्यात येणार असून, त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया

मुंबई विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठी विभाग प्रतिनिधी, अध्यक्ष, सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी व महिला प्रतिनिधी या पदांकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू होणार असून सप्टेंबरअखेपर्यंत चालणार आहे. महाविद्यालय आणि विभाग स्तरावर विद्यार्थी आपले प्रतिनिधी निवडू शकणार आहेत. त्यासाठी ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तसंच, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि सचिवांची निवडणूक होणार असून त्यासाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी आणि महिला प्रतिनिधी यांची निवड करण्यात येणार आहे.

वयोमर्यादा २५ वर्षे

विद्यार्थी संघाची निवडणूक पूर्णकालीन व नियमित विद्यार्थ्यांनाच लढवता येणार आहे. उमेदवाराने कोणताही विषय शिल्लक ठेवलेला नसावा; तसेच त्याने एटीकेटीदेखील घेतलेली नसावी. एकाच वर्गात फेरप्रवेश घेतलेला नसावा. याशिवाय उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विलंबाने शिक्षण घेणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना निवडणूक लढवता येणार नाही. याशिवाय पदवीला प्रवेश घेतल्यापासून सात वर्षे शिक्षण घेतलेले असल्यास, परीक्षा विषय गैरप्रकारात शिक्षा झाली असल्यास अथवा गुन्ह्यात दोषी ठरविले असल्यास विद्यार्थ्याला ही निवडणूक लढविता येणार नाही.

निवडणुकीचं वेळापत्रक

  • मागासवर्ग प्रतिनिधींच्या आरक्षणाची सोडत – १९ ऑगस्ट
  • तात्पुरती मतदारयादी जाहीर करणे – २० ऑगस्ट
  • मतदार यादीवर आक्षेप नोंदवणे – २१ आणि २२ ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे – २२ ऑगस्ट
  • उमेदवारीअर्ज भरणे – २३ ऑगस्ट (सकाळी ११ ते सायंकाळी ५)
  • उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे – २८ ऑगस्ट
  • विभाग आणि महाविद्यालयांमध्ये मतदान – ३० ऑगस्ट (सकाळी ११ ते दुपारी ३)
  • मतमोजणी आणि निकाल – ३० ऑगस्ट (दुपारी ४ वाजल्यानंतर)


हेही वाचा -

मुंबईत जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद


पुढील बातमी
इतर बातम्या