११वी प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ

११वीच्या पहिल्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीनं एक दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना शुक्रवार संध्याकाळपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. आतापर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील ४८ हजार २८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. ११वी प्रवेशाची पहिली फेरी सध्या सुरू आहे.

या फेरीत १ लाख १७ हजार ५५२ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यातील ४८ हजार २८४ विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार प्रवेश घेण्यासाठी गुरुवार संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र आता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून राहिलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवार संध्याकाळपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

पुढील फेरीसाठी रिक्त जागांचं तपशील शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात येणार आहे. तसंच, शनिवारपासून विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी प्राधान्यक्रमात बदल करू शकणार आहेत. दुसऱ्या फेरीची प्रवेश यादी १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा ११वीच्या पहिली गुणवत्ता यादीचा कटऑफ ९४ टक्क्यांहून अधिक आहे. नामवंत महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये गतवर्षीपेक्षा वाढ झाली. बहुतांश महाविद्यालयांनी कटऑफ ९० टक्क्यांच्या पार केल्यानं पहिल्या यादीत मोठी चुरस निर्माण झाली. १०वीचा निकाल यंदा मागील ५ वर्षांतील सर्वात जास्तचा निकाल आहे आणि याचा थेट परिणाम अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीवर झाला आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाला यंदा उशिरानं सुरुवात झाली असली तरी या वर्षी तब्बल २ लाख १२ हजार १५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये कला शाखेसाठी २० हजार ११, वाणिज्य शाखेसाठी १ लाख २५ हजार ३५५, विज्ञान शाखेसाठी ६५ हजार ६४८ विद्यार्थ्यांनी तर एमसीव्हीसीसाठी १ हजार ३८ जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी पहिल्या यादीत कला शाखेतील १२ हजार ५०२, वाणिज्य शाखेतील ६६ हजार १४० आणि विज्ञान शाखेतील ३७ हजार ९७६ आणि एचएसव्हीसीच्या ९०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.


हेही वाचा -

११वीच्या पहिली गुणवत्ता यादीचा कटऑफ ९४ टक्क्यांहून अधिक

भूगोलाच्या सर्वेक्षणासाठी १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता मोबाईल अॅप


पुढील बातमी
इतर बातम्या