आरटीई प्रवेश घेता येईल ११ मार्चपर्यंत

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • शिक्षण

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मुंबईतील वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबवण्यात येत आहे. या ऑनलाईनसाठी अर्ज करण्याची मुदत ७ मार्चपर्यंत होती. परंतु त्यात वाढ करून ती ११ मार्च २०१८ अशी करण्यात आल्याचं महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांकरीता बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (आरटीई) अंतर्गत पात्र खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्पसंख्याक शाळां वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (इन्ट्री लेवल) २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या राखीव जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रणालीद्वारे १० फेब्रुवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत प्रवेशाची कार्यवाही सुरु करण्यात येईल. याबद्दल शासनाकडून तसेच मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आलं होतं.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालक(प्राथमिक) यांच्या निर्देशानुसार या ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी ७ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु आता शासनाने त्यात वाढ करून ही मुदतवाढ ११ मार्च २०१८पर्यंत दिली आहे. तसंच याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास राज्य शासनाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, असं महापालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या