अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागातून १ लाख २० हजार ५६६ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. यापैकी ५० हजार ६२९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यानंतर आता येत्या १६ जुलैला सकाळी ११ वाजता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन जागा, इन हाऊस आणि मॅनेजमेंट कोट्यासह एकूण २ लाख १२ हजार ५९३ जागा शिल्लक आहेत. अकरावीसाठी अर्ज केलेल्या २ लाख ३ हजार १२० विद्यार्थ्यांपैकी दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ५२ हजार १९४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा बायफोकलसह एकूण प्रवेश प्रक्रियेसाठी २ लाख ९८ हजार ४०५ जागा उपलब्ध होत्या.
या गुणवत्ता यादीसाठी पसंती क्रमांमध्ये काही बदल करायचं असल्यास विद्यार्थ्यांना शुक्रवारी १३ जुलैपर्यंत ते करता येणार आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेशास पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणं बंधनकारक असणार आहे. हे करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉग-इनवरील 'प्रोसीड फॉर अॅडमिशन' हा पर्याय निवडणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश घेतला नसेल त्यांना तिसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळणार आहे.