उपस्थिती कमी असलेल्या १२३ विद्यार्थ्यांचे आयडॉलसाठी अर्ज

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजमध्ये उपस्थिती कमी असलेल्या जवळपास १२३ विद्यार्थ्यांनी गुरुवारी आयडॉलसाठी अर्ज दाखल केले आहेत. काही विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्र परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली होती. दरम्यान त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना 'आयडॉल'मधून परीक्षा देण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला होता.

१२३ विद्यार्थ्यांनी केले अर्ज

मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांतील अनेक विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने कॉलेजांनी परीक्षेसाठी प्रवेश नाकारला होता. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तर काहींनी याविरोधात आंदोलन करत परीक्षेला बसण्याची मुभा मागितली होती. यासाठी काही विद्यार्थी संघटनाही मैदानात उतरल्या होत्या. अखेर या विद्यार्थ्यांना 'आयडॉल'मधून परीक्षा देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. दरम्यान या विद्यार्थ्यांना गुरुवारी नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली असून त्यानुसार विविध शाखेच्या एकूण १२३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

परीक्षेचं वेळेपत्रक लवकरच

१२३ विद्यार्थ्यांमध्ये एफवायबीकॉमच्या सर्वाधिक, ५४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ एसवायबीएच्या ३८, एसवायबीकॉमच्या २० आणि एफवायबीएच्या ११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणीसोबत कॉलेजांकडून 'ना हरकत पत्र'देखील सादर केलं असून लवकरच या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळेपत्रक जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाने गुरुवारी जाहीर केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या