आता महिन्याभरात मिळतील पदवी प्रमाणपत्रं

पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊनही असंख्य विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळत नाहीत. हे प्रमाणपत्र देण्यासाठी मुंबई विद्यापीठाला वर्षापेक्षाही जास्त कालावधी लागतो. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं. परंतु यंदा पदवी परीक्षेत उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याभरात पदवी प्रमाणपत्र देणार असल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला आहे. 

फोर्ट कॅम्पसमधील सर कावसजी जहांगीर सभागृहात मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ झाला. यावेळी पदकविजेत्या विद्यार्थ्यांना व उल्लेखनीय गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आलं. मात्र विद्यापीठाचे विभाग व संलग्न कॉलेजमधील अन्य विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र केव्हा मिळतील? हा प्रश्न अनुत्तरीतच होता.

यावर विचारणा झाल्यावर सर्व कॉलेजांनी ३० दिवसांच्या आत म्हणजेच २७ डिसेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या कॉलेजांशी संपर्क साधून ३० दिवसांत आपली पदवी प्रमाणपत्रं घ्यावीत, असं मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सांगण्यात आलं.


हेही वाचा-

शैक्षणिक कर्ज घेण्याआधी हे जाणून घ्या

‘आयडॉल’ला हवाय प्रभावी संचालक


पुढील बातमी
इतर बातम्या