दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार

दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये होणार असल्याचं नुकतंच जाहिर करण्यात आलं होतं. पण या परीक्षा कशा होणार हे स्पष्ट नव्हतं. परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचं राज्य मंडळाच्या ऑनलाइन मीटिंगमध्ये सांगण्यात आल्याचं शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितलं.

सोमवारी राज्य मंडळाचे प्रभारी अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हयातील शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची समाज माध्यमाच्या आधारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा करण्यात आली.

गेल्या दहा महिन्यांपासून देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता २०२० मध्ये परीक्षा न घेताच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सुट्या देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाइन वर्ग सुरु करण्यात आलेत.

तर नुकत्याच परिस्थिती सुधारत असल्यानं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. तसंच साथरोगाची परिस्थिती पाहता २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परंतु बोर्डानं प्रश्नपत्रिका मात्र शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारितच केली आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीत कोरोनामुळे परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन यावर चर्चा होत होती. त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात असणारी विद्यार्थी संख्या आणि त्या तुलनेत आवश्यक सुविधांचा विचार करता ऑनलाइन परीक्षेत अडचणी येवू शकतात. त्यामुळे दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचे साबळे यांनी सांगितलं.


हेही वाचा

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

गतवर्षीच्या तुलनेत यंदा 'आयडॉल'च्या प्रवेशात घट

पुढील बातमी
इतर बातम्या