अनुपम खेर यांचा 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण एका आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन शोच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यानं राजीनामा देत अाहोत, असं अनुपम खेर यांनी ट्विट करत सांगितलं आहे. 

आॅक्टोबर २०१७ मध्ये निवड

आॅक्टोबर २०१७ मध्ये अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याआधी २०१५ मध्ये गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पण चौहान यांच्या अध्यक्षपदावरून बराच मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी चौहान यांच्याविरोधात एल्गार पुकारत त्यांना हटवण्याची मागणी केली होती. या वादानंतर २०१७ मध्ये अखेर केंद्र सरकारने अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड केली. 

निवडीवर नाराजी

अनुपम खेर यांच्या निवडीनंतरही विद्यार्थ्यांमध्ये नाराजीच होती. भाजपाच्या जवळच्याच व्यक्तीची अध्यक्षपदी निवड होत असल्याचं म्हणत ही नाराजी दर्शवण्यात आली होती. असं असताना अनुपम खेर यांनी नियुक्तीला वर्ष झाल्याबरोबर राजीनामा दिला आहे. अनुपम खेर यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, आपण नियुक्तीच्या वेळेसच सहा महिन्यांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याची कल्पना सरकारला दिली होती.

नऊ महिने परदेशात

 एका आंतरराष्ट्रीय शो च्या चित्रीकरणासाठी आपल्याला नऊ महिने परदेशात रहावं लागणार आहे. त्यामुळं या दरम्यान एफटीआयआयच्या कामाकडं लक्ष देणं आपल्याला शक्य होणार नाही. कामात प्रत्यक्ष सहभाग घेता येणार नाही. त्यामुळं हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्यानं आपण राजीनामा देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा - 

योगायोग साधणार सुशांतचा ‘प्रेम योगायोग’

संदीपच्या ‘कृतांत’चा टीझर सोशल मीडियावर


पुढील बातमी
इतर बातम्या