लेखन-अभिनय-दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी करणारा गिरीश कुलकर्णी सध्या मराठीसोबतच हिंदी सिनेमातही चांगलाच रमला आहे. ‘दंगल’ आणि ‘काबिल’ सिनेमानंतर ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजमध्ये अभिनय करणारा गिरीश ‘फन्ने खान’ या सिनेमात एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरांचा सहाय्यक म्हणून काम केलेल्या दिग्दर्शक अतुल मांजरेकरचा ‘फन्ने खान’ हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. या सिनेमातील एंट्री आणि व्यक्तिरेखेबाबतचं रहस्य गिरीशने ‘मुंबई लाइव्ह’शी चर्चा करताना उलगडलं.
‘फन्ने खान’ या सिनेमातील ती व्यक्तिरेखा मीच साकारावी अशी दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरांची इच्छा होती. त्यांची आणि माझी ओळख होतीच. त्यामुळे त्यांनी थेट फोन केला. “ही भूमिका तुम्ही कराल तर मला खूप आवडेल”, असं ते म्हणाले. त्यांना नकार देणं शक्यच नव्हतं. सिनेमातील व्यक्तिरेखाही छान आहे.
या सिनेमात मी करण कक्कड ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ऐश्वर्याने साकारलेल्या बेबी सिंग या सेलिब्रिटीचा हा मॅनेजर आहे. बेबीला शिखरावर पोहोचवण्यात याचा मोलाचा वाटा आहे. त्यासाठी त्याने खूप कष्ट घेतलेले असल्याने याला थोडा अॅटीट्युड आहेच. हा अॅटीट्युड व्यक्तिरेखेत उतरवण्याचं काम करायचं होतं.
पूर्ण डार्क नाही
‘फास्टर फेणे’मध्ये साकारलेल्या आप्पापेक्षा किंवा ‘काबिल’मधील सब-इन्स्पेक्टर प्रवीण नलावडेपेक्षा हा करण खूप वेगळा आहे. पूर्ण डार्क नाही. याचा गेटअपही खूप वेगळा आहे. सरीना यांनी काहीसा रंगीबेरंगी असा गेटअप करत करणला एक वेगळा लुक दिला आहे. त्यामुळे तो उठून दिसतो आणि सहजच लक्ष वेधूनही घेतो.
ऐश्वर्यांशी ओळख होतीच
‘विहीर’ सिनेमाच्या वेळी ऐश्वर्या राय-बच्चन यांची पहिली भेट झाली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांसाठी नवखे नव्हतो. पूर्णत: व्यावसायिक अभिनेत्रीचे सर्व गुण त्यांच्याकडे आहेत. सहकलाकाराशी नीट वागतात. कामही अगदी मन लावून करतात. त्यामुळे एक वेगळाच अनुभव मिळाला.
ऋषिकेश मुखर्जी शैलीतील
अतुल मांजरेकरचं दिग्दर्शन सुरेख आहे. त्याने ऋषिकेश मुखर्जी शैलीत एक नर्मविनोदी सिनेमा बनवला आहे. हा त्याचा पहिलाच सिनेमा असला तरी जाहिरात क्षेत्रात त्याने खूप काम केलं आहे. राकेश ओमप्रकाश मेहरांच्या सान्निध्यात राहून दिग्दर्शनाचे धडे गिरवले आहेत. त्याचं संपूर्ण सार या सिनेमात उतरवण्याचा प्रयत्न अतुलने केला आहे.
तसं पाहिलं तर या सिनेमात मी केवळ एक अभिनेता आहे. पण अतुलने लेखक म्हणून माझाही फिडबॅक घेतला. तो पुण्यात येऊन राहिला होता. कोणत्याही प्रकारचं सजेशन घेण्यासाठी नेहमी ओपन असायचा. त्यावर विचार करून स्वत:चा निर्णय घेण्याची क्षमता अतुलकडे आहे.
हेही वाचा -
‘हृदयात समथिंग समथिंग’चा फर्स्ट लूक लाँच
'ट्रॅजडी क्विन' मीना कुमारीला गुगलची आदरांजली