नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजचा दुसरा सीझन रिलिज झाल्यापासून चर्चेत आहे. कधी त्यातील कथानकामुळे, तर कधी वादग्रस्त सीन्समुळे. अशाच एका सीनमुळे या वेबसीरिजचा दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपाचे प्रवक्ते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी अनुरागविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
या वेबसीरिजमधील एका सीनमध्ये सरताज सिंग (सैफ अली खान) नावाचा शीख पोलिस अधिकारी आपल्या हातातील कडा काढून समुद्रात भिरकावताना दाखवलं आहे. याच सीनवर बग्गा यांनी आक्षेप घेतला आहे. शीख धर्मात कंगवा, केस, कडा, कच्छा आणि कृपाण हे पंच ‘क’ करार आहेत. शीख धर्मात कड्याला अतिशय पवित्र मानलं जातं. परिणामी या सीनमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याचा दावा त्यांनी केला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी मुद्दामहून हा सीन वेबसीरिजमध्ये टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
अनुरागविरोधात भादंसं आणि माहिती तंत्रज्ञान कलम २९५-अ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासनास्थानाचे नुकसान करणे अगर ते अपवित्र करणे), १५३, १५३-अ (धार्मिक भावना दुखावणे), ५०४ (जाणीवपूर्वक शांततेचा भंग करणे) आणि ५०५ (अफवा पसरवणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी अद्याप अनुराग कश्यपकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनुरागच्या भूमिकेकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा-
अमेयची इमेज ब्रेक करणार 'सेक्रेड गेम्स'
सैफ अली खानची छोट्या पडद्यावर एन्ट्री