बहुप्रतिक्षीत 'फुकरे रिटर्न्स'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट 'फुकरे' खूप गाजला होता. आता हा 'फुकरे' सिनेमाचा पुढील भाग असणार आहे. 'फुकरे रिटर्न्स'च्या नवीन भागात पुन्हा तिच चौकडी पाहायला मिळणार आहे. पुलकित सम्राट, वरूण शर्मा, मनज्योत सिंग आणि अली फझल हे चौघे पुन्हा पाहायला मिळतील.
पहिल्या भागात दाखवण्यात आलेली भोली पंजाबनही ही व्यक्तिरेखा देखील पुन्हा पाहायला मिळणार आहे. या चौघांमुळे तुरुंगात गेलेली भोली पंजाबन आपला बदला घेताना दिसणार आहे.
सोप्या मार्गानं पैसे कमवण्यासाठी चार मित्र काय ना काय जुगाड करत असतात, यावरच हा चित्रपट आधारित आहे. मृगदिप सिंग लांबा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात चूचा आणि लाली यांच्यातील मजेशीर संवाद, मास्टर चूचाची भविष्यवाणी या गोष्टी नव्यानं सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर आणि कलाकारांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. हे पोस्टर मजेशीर असून प्रेक्षकांना नक्कीच हसू येईल. फुकरे रिटर्न्स १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.