अक्षय कुमारच्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोमधून झालेल्या हकालपट्टीमुळे चर्चेत असलेली कॉमेडियन मल्लिका दुआ पुन्हा चर्चेत आली आहे. पण यावेळी ती चर्चेत आली आहे ती अक्षय कुमारमुळे. मल्लिका दुआ लाफ्टर चॅलेंज शोमध्ये असताना घडलेल्या एका प्रसंगावरुन तिने आणि तिचे वडील विनोद दुआ यांनी अक्षय कुमारवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे.
मल्लिका दुआ अक्षय कुमारच्या द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शोमध्ये मेंटॉर असतानाचा हा किस्सा. एका स्पर्धकाने चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर शोच्या पद्धतीनुसार अक्षय कुमार प्रेक्षकांमध्ये लावलेली मोठी घंटा वाजवायला मागे गेला. त्यानंतर मल्लिका आणि तिच्यासोबतचे इतर दोन मेंटॉरही घंटा वाजवायला मागे गेले. मात्र ते घंटा वाजवत असताना अक्षय कुमार मस्करीमध्ये 'मल्लिका तुम बेल बजाओ, मै तुम्हे बजाता हूँ' असं म्हणाला. झालं. याच मुद्द्यावरुन सोशल रणकंदन सुरु झालं!
वास्तविक हा सगळा प्रकार मल्लिका दुआ शोमधून बाहेर पडण्यापूर्वीचा म्हणजेच जवळपास आठवडाभरापूर्वीचा आहे. पण तेव्हा हा कोणताही मुद्दा बाहेर येण्याऐवजी आत्ता, मल्लिका दुआ शोमधून बाहेर पडल्यानंतर तिचे वडील आणि प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांनी हा मुद्दा उकरुन काढला आहे. 'अक्षय कुमारची कॉमेंट ही अश्लील होती आणि त्याविरोधात आपण आवाज उठवणार' अशा आशयाची पोस्ट आणि सोबत संबंधित व्हिडिओ विनोद दुआ यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे.
दरम्यान, विनोद दुआ यांनी फेसबुक पोस्ट केल्यानंतर मल्लिकानंही ट्विट करून 'आपल्याला अशा प्रकारच्या विनोदामुळे अनकम्फर्टेबल वाटतंय' अशा शब्दांत निषेध व्यक्त केला.
वास्तविक पाहाता हा सगळा प्रकार एक आठवड्यापूर्वीचा आहे. मग आत्ताच मल्लिकाला तिच्यावर झालेली अश्लील शेरेबाजी का आठवली? शिवाय, मल्लिका तिच्या युट्यूब आणि इतर काही चॅनेलवर सुरु असलेल्या शोमध्ये स्वत: याहून अधिक आक्षेपार्ह भाषा वापरते. मग तिला अक्षय कुमारची कॉमेंटच इतकी आक्षेपार्ह का वाटली? असे काही प्रश्न या निमित्ताने विचारले जाऊ लागले आहेत.
मुळात हा सगळा प्रकार मल्लिका दुआला शोमधून बाहेर काढल्यामुळे सुरु असल्याचा दावाही काहींनी केला आहे.
हेही वाचा