#Metoo: अनू मलिकला दणका; इंडियन अायडाॅलमधून हकालपट्टी

मी टू च्या वादळाचा तडाखा संगीतकार अनू मलिकलाही बसला आहे. गायिका सोना महापात्रा आणि श्वेता पंडीत यांच्यासह अन्य काही तरूणींनी अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर अनू मलिक यांना इंडियन आयडाॅल १० या रिअॅलिटी शो मधून हटवण्यात आलं आहे. सोनी वाहिनीनं यासंबंधीचा निर्णय घेत त्यांना परीक्षक पदावरून हवटल्याची माहिती समोर येत आहे.

२००१ मधील घटना 

गायिका श्वेता पंडीत हिने मी टू मोहिमेंतर्गत नुकतंच एक ट्वीट करत अनू मलिक यांनी आपल्याला शान आणि सुनिधी चौहानसारख्या गायिकांबरोबर गाण्याची संधी देऊ असं म्हणत किस मागितल्याचं म्हटलं होतं. २००१ मधील घटना असल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तर सोना महापात्रा हिने तर अनू मलिक हे सिरिअल सेक्शुअल प्रीडेटर म्हणजेच महिलांचं वारंवार शोषण करणारी व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे.

७ वर्षांपूर्वी गैरवर्तन 

दोन गायिकांनी अनू मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले असतानाच इंडियन आयडाॅल १० च्या सिझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एका नवोदित गायिकेला विचारणा करण्यात आली. मात्र तिने या शो मध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला. ७ वर्षांपूर्वी आपल्याशी अनू मलिक यांनी गैरवर्तन केल्यानं आपण या शोमध्ये सहभागी होऊ शकत नसल्याचं तिने सांगितंल आणि अनू मलिक यांच्या अडचणी वाढल्या.

सोना महापात्राला भेटलोच नाही

या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोनी वाहिनीने अनू मलिक यांना शो सोडण्यास सांगितलं होतं. आता मात्र सोनीनं यासंबंधीचा अंतिम निर्णय घेत अनू मलिकला शोमधून हटवलं आहे. आता नेहा कक्कर आणि विशाल हे दोघे या शोचं परिक्षण करणार असल्याचंही समजत आहे. अनू मलिक यांनी मात्र आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. सोना महापात्रासोबत आपण कधीही काम केलेलं नाही वा तिला कधीही भेटलो नसल्याचा अनू मलिक यांचा दावा आहे. तर मी टू मोहिमेचा गैरवापर केला जात असल्याचं अनू मलिक यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.


हेही वाचा - 

#MeToo चा गैरवापर नको, मुंबई उच्च न्यायालयाने खडसावलं

#MeToo: माझ्यावर कारवाई करू नका, आलोकनाथ यांचं 'सिन्टा'ला साकडं

#MeToo: माझ्यावरील अारोप खोटे, नाना पाटेकरांचं सिन्टाला उत्तर


पुढील बातमी
इतर बातम्या