घरोघरी घुमणार ‘नाम’चा गजर!

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोन अभिनेत्यांनी सुरू केलेल्या समाजकार्याचा वेलू आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेलं नाना-मकरंद यांचं काम आता छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचणार आहे. या निमित्ताने मकरंदने ‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचीत करत ‘नाम’च्या कामाबाबत सांगितलं.

‘तो सध्या काय करतोय’?

मागील बऱ्याच दिवसांपासून मकरंदचा सिनेमा प्रदर्शित न झाल्यानं सध्या तो नेमकं काय करतोय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडणं साहजिक आहे. मध्यंतरी आलेल्या ‘उलट सुलट’ या नाटकात मकरंदने मुख्य भूमिका साकारली होती, पण तो सिनेमात काही दिसला नाही. मागील तीन वर्षांपासून त्याने म्हणजेच मकरंदने स्वत:ला ‘नाम’च्या कामात झोकून दिलं आहे.

‘नाम’चं काम खूप मोठं...

‘नाम’च्या कामाची व्याप्ती आज इतकी वाढली आहे की, एका बातमीत सामावण्याइतकी नसल्याचं मकरंद म्हणाला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामं ‘नाम’च्या माध्यमातून सुरू आहेत. या कामी अनेकांचं योगदान लाभलं आहे. त्यामुळे अमूक एकाचाच उल्लेख करणं योग्य ठरणार नाही, पण एक खरं आहे की, ‘नाम’मुळे पक्षीय राजकारण बाजूला सारून लोक संघटित झाले आणि त्यातून ते स्वहित साध्य करीत आहेत.

छोट्या पडद्याद्वारे घराघरात पोहोचणार...

‘नाम’च्या माध्यमातून केलेलं कार्य महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणार असल्याचं सांगत मकरंद म्हणाला की, ‘नाम’चं काम हे मानवसेवेचं आहे. ‘नाम’ने आजवर केलेलं काम आता टेलिव्हिजनद्वारे घराघरात पोहोचणार आहे. सध्या यासाठी वाहिन्यांशी बोलणं सुरू आहे. आजपर्यंत केलेलं काम एकूण १५ भागांमध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत विचार विनीमय सुरू आहे. यामागे पब्लिसिटी मिळवण्याचा हेतू नसून, लोकांच्या सहकार्यातून लोकांसाठी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचा मानस आहे.

सध्या सर्व्हे सुरू...

‘नाम’च्या माध्यमातून आजपर्यंत झालेली सर्व कामं जशी एका लेखात किंवा बातमीत सामावणारी नाहीत, तशी ती टेलिव्हिजनवरही दाखवणं शक्य होणार नाहीत. त्यामुळे कोणकोणती कामं दाखवता येऊ शकतात, याचा अभ्यास सध्या सुरू आहे. मागील सहा महिन्यांमध्ये जवळजवळ सव्वाशे गावांमध्ये काम झालं आहे. त्यामुळे केवळ नेमकं किती काम टेलिव्हिजनवर दाखवायचं याबाबतही विचारविनिमय सुरू आहे.

दुर्गम भाग पिंजून काढला...

शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करण्याच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘नाम’च्या या यज्ञाने आता विविध कामांचं रूप धारण केलं आहे. यात पाण्याचं काम प्रामुख्याने सुरू असून, महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील जनतेची तहान भागवण्याला प्राधान्य दिलं जात आहे. यासाठी मराठवाड्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील विविध गावं, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, माणखटाव, तसंच यवतमाळ, वर्धा, नागपूरसह विदर्भातही ‘नाम’ने आपल्या कार्याचा ठसा उमटवत गोरगरीबांची सेवा केली आहे.

पुढेही बहुत करणे आहे...

‘नाम’च्या कामाचा हा यज्ञ यापुढेही सुरूच अखंड राहणार असल्याचं मकरंदचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून तिथली परिस्थिती बदलण्याचा आमचा निश्चय आहे. या कामात स्वत:हून मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्यांची गरज आहे. हा एकट्याचा खेळ नाही. सर्वांची साथ लाभली तरच शक्य आहे. आणखी बऱ्याच ठिकाणी पोहोचायचं आहे.


हेही वाचा -

Exclusive: अभिनेत्री मृण्मयीचं दिग्दर्शनात पदार्पण!

Exclusive: 'एक' चेटकीण करतेय अाबालवृद्धांवर जादू!


पुढील बातमी
इतर बातम्या