फसलेला 'अंड्याचा फंडा'!

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

'अंड्या चा फंडा' हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झालाय. अंड्या म्हणजेच अथर्व आणि फंड्या म्हणजे फाल्गुन हे दोघे एकाच शाळेत शिकणारे जिवलग मित्र. अंड्या श्रीमंत घरातला आणि अभ्यासात हुशार, त्या उलट फंड्या गरीब घरातला आणि अभ्यासात ढ. पण तरीही हे दोघे सतत एकमेकांना साथ देणारे. फंड्याला त्याच्या स्वप्नात नेहमी वेगवेगळ्या गोष्टी दिसायच्या, ज्यात त्याला जुना बंगला, मंदिर, गाव हे असं सगळं दिसायचं. त्याचं वर्णन तो अंड्याला सांगायचा आणि अंड्या त्याचं चित्र काढायचा. 

त्या दोघांचं शाळेतल्या दुसऱ्या मुलांबरोबर नेहमी भांडण व्हायचं. ते दोघे एकदा त्या मुलांना घाबरवण्याचा प्लॅन करतात. फंड्या त्याचदरम्यान गावी जाणार असतो. तो अंड्याला सांगतो की गावी गेल्यावर इथे तू सगळ्यांना असं सांग की माझा अपघात झाला आहे आणि त्यातच माझा मृत्यू झाला. मी मुंबईला आलो की आपण सर्व मुलांना मी भूत आहे असं म्हणत घाबरवू. असं ठरवून फंड्या त्याच्या आई वडिलांबरोबर गावी जातो. 

त्याच्या काही दिवसांनंतर अंड्याच्या वर्गात त्यांचा शाळेचा  शिपाई फंड्याचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी घेऊन येतो. अंड्याला वाटतं त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे फंड्याने बातमी शाळेत पोहोचवली असेल. शाळा सुटून अंड्या फंड्याला त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटायला जातो. तिथे फंड्या त्याची वाट पाहत असतो आणि तो त्याला सांगतो की माझा मृत्यू खोटा नाही तर खरंच त्याचा गावी अपघात होऊन मृत्यू झाला आहे. आणि तो फक्त अंड्यालाच दिसतोय. हे सगळं ऐकून अंड्याला धक्का बसतो आणि तो आजारी पडतो.

अंड्या त्याच्या घरच्यांना याबद्दल सांगतो, पण घरचे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. उलट त्याला फंड्याच्या मृत्यूच्या बातमीने धक्का बसलाय आणि म्हणून त्याला तो दिसतोय असं समजून ते त्याला गोळ्या-औषधं देतात. त्यानंतरही फंड्या अंड्याला दिसतो, तेव्हा अंड्या त्याला विचारतो की तू मला असं भेटून त्रास का देतोयस? आणि फंड्या त्याला सांगतो की त्याच्या काही इच्छा आहेत. त्या पूर्ण झाल्या की त्याला मुक्ती मिळेल. फंड्या अंड्याकडून त्याला मदत करण्याचं वचन घेतो.

फंड्या अंड्याला कोकणात जाऊनच मला हव्या असलेल्या गोष्टी करता येतील असं सांगतो. पण अंड्याची आई त्याला कोकणात पाठवायला नकार देते. पण त्याचदरम्यान अंड्याच्या शाळेचा कॅम्प कोकणात जात असतो, म्हणून अंड्याला कोकणात जायला कारण मिळतं. कोकणात गेल्यावर फंड्या अंड्याला त्याला स्वप्नात दिसत असणाऱ्या जुनाट घराजवळ घेऊन जातो आणि त्यात असणाऱ्या मोडक्या कपाटात असलेला फोटो बाहेर काढतो. त्या फोटोत अंड्याच्या आईचा लग्नाचा फोटो असतो. पण आईबरोबर दुसराच पुरुष असतो. ते पाहून अंड्याला धक्का बसतो. तेव्हा फंड्या त्याला सांगतो की त्या पुरुषाचं नाव विनायक आहे आणि तो मी म्हणजेच फंड्या आहे. जो आता या जगात नाही आणि मला म्हणजेच विनायकला १५ वर्षांपूर्वी माझ्या बायकोने म्हणजेच कुमुदने, जी आता देवयानी म्हणजेच तुझी आई आहे, तिने मला मारुन टाकलं होतं. अंड्याला यावर विश्वास बसत नाही. 

तिथून अंड्या आणि फंड्या विनायकचा खरा मारेकरी कोण? याचा शोध सुरु करतात. या सर्व गोष्टीत त्यांना कोकणातलीच वासंती नावाची त्यांच्याच वयाची मुलगी मदत करते. गोष्ट जसजशी पुढे सरकत जाते, तश्या अनपेक्षित गोष्टी घडत जातात. ते तीन मुलं त्या मारेकऱ्याला शोधण्यात यशस्वी होतात का? अंड्याची आई म्हणजेच कुमुदचं लग्न विनायक बरोबर झालं होतं, तर तिची ओळख नंतर देवयानी कशी झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सिनेमा पाहिल्यावर सापडतील.

सिनेमाची सुरुवात बरी होते, पण जसजसा सिनेमा पुढं सरकत जातो तसतसा तो जास्त कंटाळवाणा होत जातो. सिनेमाची कथाच मुळात छाप सोडत नाही. त्यामुळे तो कसाही गुंफला असला, तरीही प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात अयशस्वी ठरतो. सिनेमात दिसणारी ३ मुलं म्हणजेच अथर्व बेडेकर (अंड्या), शुभम परब (फंड्या), मृणाल जाधव (वासंती) या तीन बालकलाकारांनी त्यांच्या भूमिकाला जमेल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. अंड्याच्या आईच्या भूमिकेत दिसणारी दीपा परब (देवयानी) हिला खूप वर्षांनंतर तिला सिनेमात पाहायला बरं वाटत. अंड्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणारा सुशांत शेलार (मंदार) याची महत्त्वाची भूमिका असूनही त्याला खूप काम दिलं गेलेलं नाही. या व्यतिरिक्त दिसणारे कलाकार अरुण नलावडे, अजय जाधव, किरण खोजे, आरती वडगबालकर, माधवी जुवेकर, संदेश कुलकर्णी, समीर विजयन या सर्वांनी त्यांना दिलेल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. 

एवढे स्टारकास्ट असतानाही सिनेमा तितकास भावत नाही. काही प्रश्नांची तर उत्तरंच मिळत नाहीत. काही गोष्टींचा संदर्भच लागत नाही. सिनेमात दाखवण्यात आलेल्या कोकणातल्या जागा, घरं, समुद्र पाहायला खूप छान वाटतायत. सिनेमातली गाणीही ठीकच आहेत. मात्र सिनेमात खूप भावणारं, आवडणारं असं काहीच नाही. संतोष शेट्टी दिग्दर्शित या सिनेमात वेगळा विषय मांडण्याचा चांगला प्रयत्न केला गेला असला तरीही सिनेमा भावत नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या