'बस स्टॉप' सिनेमा का पाहू नये, याची 5 कारणं!

  • शुभांगी साळवे & मुंबई लाइव्ह टीम
  • मनोरंजन

काही सिनेमे फक्त बनवायचे म्हणून बनवले जातात असेच वाटतात. या आठवड्यात प्रदर्शित होणारा समीर जोशी दिग्दर्शित 'बस स्टॉप' हा त्यातलाच एक म्हणावा लागेल. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेंमत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, सुयोग गोरे ही एवढी भलीमोठी स्टार कास्ट असूनही सिनेमात या कोणाचीच जादू चालू शकलेली नाही.

सिनेमा फेल ठरल्याची 5 कारणं...

1. पालक आणि पाल्य यांच्यातील नातं, तरुण वयात होणारं प्रेम, नंतर प्रेम आणि आईवडील यामध्ये तरुण वयात असलेल्या मुलामुलींची होणारी ओढाताण. हे 'बस स्टॉप' या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला असला, तरीही हा प्रयत्न पुरता फसलाय.

2. सिनेमात दिसणारे कलाकार एवढे अनुभवी असतानाही त्यांची अॅक्टिंग 'ओव्हर अॅक्टिंग' वाटत रहाते.

3. अमृता खानविलकरने उगाचच स्वतःला चुणचुणीत दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे अगदी स्पष्ट दिसून येतं आणि त्यावर हसायलाही येतं. तसंच सिद्धार्थ चांदेकरच्या बाबतीतही झालंय. उगाचच त्याच्याकडून वऱ्हाडी भाषा बोलवून घेण्याचा अट्टाहास का केला गेला आहे? हेही कळत नाही.

4. सिनेमा भावत नाही यासाठी त्या सिनेमाचे डायलॉग्स ही तितकेच जबाबदार आहेत. सिनेमात ओढून ताणून विनोद करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण सिनेमातला एकही विनोद प्रेक्षकांना हसवत नाही.

5. सिनेमा संपेपर्यंत खूप सारे प्रश्न डोक्यात फिरू लागतात. आपल्या मुलीला संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर घरीच यायचं, असं सांगणारा बाप. मात्र, मुलगी अचानक घराबाहेर पडते तेव्हा ते वडिलांना कसं समजत नाही? दुसऱ्या बाजूला अतिशय आज्ञाधारी असलेली मुलगी वडिलांच्या एवढी विरोधात कशी जाते? असे एक ना अनेक प्रश्न प्रेक्षकाला गोंधळात टाकतात.

एकंदरीतच स्टोरी असो, कलाकारांची अॅक्टिंग असो किंवा डायलॉग्स, सगळ्या बाबतीत 'बस स्टॉप' काही पचनी पडत नाही. एका पॉईंटला सिनेमा कधी संपणार याचीच प्रेक्षक वाट पाहायला लागतो.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या