coronavirus lockdown : घर बसल्या फुल टू मनोरंजन, पाहा या ५ मराठी वेबसिरीज

कोरोनामुळे (coronavirus) सध्या अंशत: लॉक डाऊनची (Lockdown) परिस्थिती उद्भवली आहे. बहुतांश कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फर्म होम लागू केलं आहे. तर २० मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्व खाजगी कंपन्या बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

सध्या उद्भवलेल्या या परिस्थितीत नागरिक सुट्टी असली तरी बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातच राहायचं आहे. पण कंटाळा तर येणारच. किती दिवस काही न करता घरी थांबणार. म्हणूनच आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी मराठीतील काही वेबसिरीजची नावं सांगणार आहोत. या वेबसिरीज तुमचा वेळ चांगलाच घालवतील.

१) समांतर

‘समांतर’ या वेब सिरीजमध्ये कुमार महाजनच्या प्रवासाचा शोध दाखवण्यात आला आहे. कुमार महाजनची भूमिका मराठी सुपरस्टार स्वप्निल जोशी साकारणार आहे. या वेबसिरीजमधून स्वप्निल जोशी डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत आहेत. आपल्या कुटुंबाच्या गरजा तो भागवू शकत नाही. त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीदेखील चुकीच्या मार्गावर जात असल्याचं दिसतंय. तेजस्विनी पंडित यांनी स्वप्नीलच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. ९ एपिसोडची ही मालिका सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे.

२) आणि काय हवं

वास्तविक जीवनात नवरा-बायको असणारे उमेश कामत आणि प्रिया बापट हे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत एका नवविवाहित जोडप्याच्या जीवनाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. पहिलं घर, पहिली कार, पहिल्यांदा झालेलं भांडण हे सर्व चांगल्या प्रकारे मांडण्यात आलं आहे. ही मालिका प्रत्येक जोडप्याला आपलीशी वाटेल. कारण प्रत्येक जोडपं यातून कधी ना कधी गेलेलं असतं. ही हलकी फुलकी रोमँटिक मालिका आपल्या जोडीदारा बरोबर नक्की पाहू शकता.

३) पांडू

मुंबई पोलिसांच्या दैनंदिन जीवनावर ही मजेदार मालिका आधारीत आहे. सुहास सिरसाट आणि दीपक शिर्के अभिनीत, ‘पांडू’ ही मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठीची पोलिसांची धडपड दाखवणारी आहे. पोलिसांची ड्युटी आणि कुटुंब अशी तारेवरची कसरत यात नाट्यमय आणि मजेदार पद्धतीनं मांडली आहे.

४) वन्स अ इयर

रोमांस आणि प्रेम यांची सांगड घालणाऱ्या या मालिकेचे ६ एपिसोड आहेत. ही मालिका मृण्मयी गोडबोले आणि निपुण धर्माधिकारी या सहा वर्षांपासून नात्यात असलेल्या जोडप्याच्या रोमँटिक प्रवासाचा पाठपुरावा करते. कॉलेजमधून सुरू झालेली त्यांची मैत्री, मग प्रेम आणि त्यानंतर आयुष्य एकत्र घालवण्याचा प्रवास यात मांडण्यात आला आहे.

५) फेमसली फिल्मफेअर मराठी

एमएक्स प्लेअरनं ‘फेमली फिल्मफेअर मराठी’ ही मालिका सादर केली आहे. सेलिब्रिटी चॅट शो मालिका जी आपल्या पसंतीच्या सेलिब्रिटीची बाजू आपल्यासमोर आणते. हा कार्यक्रम प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या जीवनातील अनेक चढ-उतार उघड करतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृता खानविलकर करीत आहेत आणि पाहुणे म्हणून ए-लिस्टरचे सेलिब्रिटी येत आहेत.


हेही वाचा

कान्स फिल्म फेस्टिवलला कोरोनाचा फटका, तारीख पुढे ढकलली

Coronavirus : बॉलिवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव, 'या' गायिकेला झाला कोरोनाचा संसर्ग

पुढील बातमी
इतर बातम्या