Exclusive: पुलंच्या साहित्याचा परवानगीविना वापर; नमुने मालिकेवर 'आयुका'चा ५० लाखांचा दावा

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा परवानगीविना वापर केल्याबद्दल 'इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फाॅर अॅस्ट्राॅनाॅमी अॅन्ड अॅस्ट्रोफिझीक्स' (अायुका) या संस्थेने सब टीव्हीवरील ‘नमूने’ या हिंदी मालिकेवर ५० लाख रुपयांचा दावा ठोकला आहे.

व्यक्ती आणि वल्लीवर आधारित

पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या गाजलेल्या पुस्तकातील व्यक्तिरेखांवर आधारित असलेली ‘नमूने’ ही मालिका २१ जुलैपासून सब टीव्हीवर सुरू झाली आहे. या मालिकेत पुलंच्या लेखणीतून आकाराला आलेल्या बऱ्याच व्यक्तिरेखा सादर केल्या जात आहेत. यातील परोपकारी गंपू ही व्यक्तिरेखा ‘नमूने’मध्ये सादर करण्यात आली आहे. पुलंच्या साहित्याचा वापर मालिकेसाठी करण्याआधी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतल्याने ‘नमूने’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

साहित्याचे अधिकार आयुकाकडे

या मालिकेची निर्मिती करणाऱ्या दशमी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने आणि सोनी सब टीव्ही वाहिनीने काॅपीराईट कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फाॅर अॅस्ट्राॅनाॅमी अॅन्ड अॅस्ट्रोफिझीक्स (IUCAA - आयुका) या संस्थेने वाहिनी आणि निर्मितीसंस्थेला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुलंच्या साहित्याचे अधिकार त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनिता पुरुषोत्तम देशपांडे यांच्याकडे आले. सुनिता देशपांडे यांनी १० आॅगस्ट २००६ रोजी केलेल्या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या निधनानांतर पुलंच्या साहित्याचे अधिकार आयुकाकडे अाल्याचं या नोटिसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

साहित्य खुलं नाही 

पुलंचं साहित्य कोणासाठीही खुलं नाही असं म्हटलं जातं. पण याचे अधिकार नेमके कोणाकडे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळेच यापूर्वीही जेव्हा पुलंच्या साहित्यावर कलाकृती बनवण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तो कायदेभंगाच्या कचाट्यात अडकल्याचं पाहायला मिळालं आहे.

आम्हाला नोटिस मिळाली आहे.  पण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. आयुकाने पाठवलेल्या नोटिसीला आमचे वकील योग्य उत्तर देतील.

- नितीन वैद्य, दशमी क्रिएशन्स

या प्रकरणावर सध्या काहीही बोलता येणार नाही. पुलंच्या साहित्याबाबत आता माझ्याकडून काहीच माहिती देता येणार नाही. आयुकाकडूनही यावर काहीही सांगण्यात येणार नाही.

- कल्याणी पाठक, वकील (आयुका)


हेही वाचा -

आजच्या पिढीची कथा ‘टेक केअर गुड नाईट’ : पर्ण पेठे

‘प्रँक’ करताना नम्रताचा उडाला थरकाप!


पुढील बातमी
इतर बातम्या