पाॅवर कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीत विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा बंद हाेऊन आता रिसेप्शनच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या रिसेप्शनचं इन्व्हिटेशन कार्ड कसं असेल, पार्टीला कुणाकुणाला निमंत्रण असेल इथपासून पार्टीत कुठला मेन्यू असेल? अशा सर्व विषयांचा त्यात समावेश आहे.
त्यातील एका विषयाची जिज्ञासा ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट यांनी शमवली आहे. त्यांनी विराट अनुष्काच्या रिसेप्शनच्या इन्व्हिटेशन कार्डचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत त्यांच्या चाहत्यांना खूश केलं आहे.
विराट आणि अनुष्काच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी २१ डिसेंबरला दिल्लीत आणि २६ डिसेंबरला मुंबईत होणार आहे. या रिसेप्शनला दोघांनीही आपल्या नातेवाईकांसोबत क्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींनाही आमंत्रण पाठवलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे महेश भट्ट. भट्ट यांनी ट्विटरवर फोटो टाकतानाच दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे रिसेप्शन कार्ड पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. त्यावर गुलाबाचं आकर्षक प्रिटिंग आहे. कार्डच्या डाव्या बाजूला एक रोपटं असून उजव्या बाजूला विराट, अनुष्काचं नाव छापण्यात आलं आहे.
मुंबईत होणाऱ्या रिसेप्शन पार्टीसाठी दोघांनीही जुहूतील एक ५ स्टार हाॅटेल बुक केल्याचं म्हटलं जात आहे.